विविध मागण्यांसाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनी आपल्या विविध समस्या व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आणि जिल्हा परिषद भवनासमोर २ अशा ६ उपोषणकर्त्यांनी आंदोलन छेडले. संबंधितांना ३० तारखेला संबंधित विभागांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्यावर ही उपोषणे मागे घेतली.

सिंधुदुर्गनगरी - प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनी आपल्या विविध समस्या व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आणि जिल्हा परिषद भवनासमोर २ अशा ६ उपोषणकर्त्यांनी आंदोलन छेडले. संबंधितांना ३० तारखेला संबंधित विभागांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्यावर ही उपोषणे मागे घेतली.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅंकेच्या सेवानिवृत्त ३६ कर्मचाऱ्यांना ७ ते ८ वर्षे होऊनही अद्याप निवृत्तिवेतन मिळालेले नाही. अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता मिळण्यासंदर्भात दाखल याचिकेनुसार ४४ लाख १३ हजार रुपयांची रक्कम शिखर बॅंकेकडून नोव्हेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या मासिक पगारपत्रकास मंजुरी मिळालेली नाही. २७ कर्मचाऱ्यांना गेले ३७ महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅंकेच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण केले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष वि. गो. पराडकर, पी. के. कासले, एस. बी. कदम, एम. टी. सुर्वे, एस. के. गावकर आदी उपस्थित होते.

निगुडे येथील स्वाती शत्रुघ्न तुळसकर यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत काजू फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत २५ लाख ९९ हजार रुपये असून यासाठी १० लाख ७५ हजारांचे अनुदान १ सप्टेंबर २०१५ रोजी मंजूर झाले होते; मात्र न्हावेली येथील संदीप मांजरेकर आणि निगुडे येथील महेश सावंत यांच्या तक्रारीनंतरही हे अनुदान देण्यास राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून टाळाटाळ केली. याविरोधात काल शत्रुघ्न तुळसकर व स्वाती तुळसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.

रमाई घरकुल योजनेअंतर्गत वेंगुर्लेतील लाभार्थी मधुमती मधुकर जाधव यांची घर बांधकामाची कागदपत्रे पूर्ण असताना दुसरा व तिसरा हप्ता देण्यात आलेला नाही. यासाठी मधुमती जाधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या. वेंगुर्ला पारंपरिक मच्छीमार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.

कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्ता ते पालकरवाडी-कोंडुस्करवाडी हा रस्ता खराब झाला आहे. रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी आठवडाभरात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र रस्त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने पुन्हा जिल्हा परिषदेसमोर उपोषण छेडले. कणकवलीतील प्रभाकर नेरुरकर यांनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

Web Title: fasting for fishing issue