ओसरगाव तलावासाठी आमरण उपोषण 

तुषार सावंत
Sunday, 17 January 2021

राणे यांच्या समवेत ओसरगाव येथील सुदर्शन नाईक, नंदकुमार गावडे हे देखील उपोषणात सहभागी झाले आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) -  ओसरगावचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते बबली उर्फ चंद्रहास राणे यांनी ओसरगाव तलावाकाठी मध्यरात्रीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ओसरगाव तलावाच्या विकासासाठी ठोस कार्यवाही व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मागणीची दखल न घेतल्यास ओसरगाव तलावात जलसमाधी घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्‍त केला आहे. 

राणे यांच्या समवेत ओसरगाव येथील सुदर्शन नाईक, नंदकुमार गावडे हे देखील उपोषणात सहभागी झाले आहेत. ओसरगाव तलावात नौका विहाराची चांगली संधी असलेले हे सुंदर तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी वीस वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. लोकप्रतिनिधींना सातत्याने निवेदने दिली; मात्र सर्वांनीच ओसरगाव तलावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहिला नसल्याची भूमिका राणे यांनी मांडली. तसेच जोपर्यंत तलाव विकासासाठी ठोस कार्यवाही होत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असून प्रसंगी जलसमाधी घेणार असल्याचाही इशारा त्यांनी आज दिला. 

आता माघार नाही 
दरम्यान कणकवलीचे पोलिस निरीक्षक संजय धुमाळ, लघु पाटबंधारेचे अधिकारी श्री. तवटे, श्री. लिग्रज, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शिशिर परुळेकर, पोलिसपाटील संजना आंगणे, ऍड. विलास परब आदींनी राणेंशी चर्चा केली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली; पण ठोस आश्वासना शिवाय माघार नसल्याचा इशारा राणे यांनी दिला.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fasting osargaon lake kankavli konkan sindhudurg