फौजी आंबवडे गाव आजही जपतेय सैनिकी परंपरा

WhatsApp-Image-2018-08-14-a.jpg
WhatsApp-Image-2018-08-14-a.jpg

महाड : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची परंपरा जपणारे गाव प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही टिकून आहे. फौजी आंबवडे गावाने देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाही.

सैन्यातील नोकरी आता बिकट होउ लागली आहे. सीमोपलिकडे वाढणा-या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव 23 लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात येथील अनेक कुटुंब होती. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही काहींनी गुप्तहेरांची जबाबदारी पार पाडली होती. गावातील या पराक्रमाची साक्ष वतनदारी सनदीचे कागद व मानाची पंचधातूची तलवार गावात देत असते.

पहिल्या महायुद्धात (1914-1919) या गावातील 111 जवानांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाली . याची साक्ष ब्रिटिश सरकारने गावात उभारलेला स्मृतिस्तंभ आजही देत आहे. दुस-या महायुद्धात 250 तरुणांनी भाग घेतला त्यातील 70 जणांना वीरगती प्राप्त झाली.एकाच दिवशी 21 धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्याचे वृध्द व्यक्ती सांगात. भारत- पाकिस्तान, बांगलादेश युद्धातही गावातील अनेक सुपुत्रांनी मर्दुमकी गाजवली. 1964-65 च्या भारत-पाक युद्धात सुभेदार रघुनाथ गणपत कदम यांना वीरमरण आले तर लेह लडाख येथे 2003 मध्ये झालेल्या भारत-पाक चकमकीत मनोज पवार हे शहीद झाले.

आज सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत तर एकशे बारा निवृत्त झालेले आहेत. तरुण वर्ग सैन्य भरतीत कायम पुढे असतो. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोहर रखमाजी पवार यांना तसेच काहीना त्यांच्या कामगिरीबद्दल सेनापदकेही मिळालेली आहेत. या गावातील तरुण शिक्षण कोणतेही घेतील परंतु सैन्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही असे माजी सैनिक कृष्णा पवार यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com