देशात भाजप राबवितो ‘हेट अजेंडा’ - फौजिया खान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

चिपळूण - केंद्र सरकारची संविधानाबद्दल आदराची भूमिका नाही, संविधान बदलण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मंत्रीही बेताल वक्तव्ये करीत आहेत. यातून संविधानाला धोका निर्माण झाला असून अराजकता पसरण्याची चिन्हे आहेत. भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजनबद्धरीत्या जाती-जातीत ‘हेट अजेंडा’ राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव देश बचाव मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हानिहाय कार्यक्रम घेतले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फौजिया खान म्हणाल्या, संविधान बचावासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. केंद्राकडून संविधान बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. संविधानाच्या प्रती जाळल्या तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. 

देशात अघोषित आणीबाणीची स्थिती आहे. शासनाचा मनुवाद आणण्याचा प्रयत्न आहे. लोकांच्या रक्तात कास्ट सिस्टम रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मनुवाद आणू देणार नाही. यामुळेच मनुवाद व इव्हीएम मशीनची होळी करीत असल्याचे स्पष्ट केले.

पाग माध्यमिक विद्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक इव्हीएम मशीन व मनुवादाची होळी केली. यावेळी बाबाजी जाधव, शेखर निकम,. चित्रा चव्हाण, मिलिंद कापडी, दादा साळवी, राकेश चाळके, दशरथ दाभोळकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पंतप्रधान मोदींचे मौन
‘मन की बात’मध्ये संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेबाबत चकार शब्द काढत नाहीत. संविधान वाचविण्यासाठी राष्ट्रवादीसह देशातील समविचारी पक्ष व नागरिक पुढाकार घेत आहेत. संविधानाला धोका निर्माण झाल्यास देशात अराजकता माजेल. महिलांसाठी जगात सर्वांत असुरक्षित देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातील संविधानात्मक संस्थांवर केंद्राचा मोठा दबाव आहे. यातून मीडियादेखील सुटलेला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.

Web Title: fauzia khan comment