जैवविविधेवर ‘कोरोना इफेक्ट’ : तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळताहेत मुबलक शिवल्या

शिरीष दामले
गुरुवार, 21 मे 2020

लॉकडाऊनमुळे जैवविविधता सध्या आनंदली आहे...

रत्नागिरी : पंधरा वर्षांपूर्वी या खाडीत आम्हांला शिवल्या भरपूर मिळायच्या, नंतर बंद झालेल्या. पण गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा मिळू लागल्यात. हे वाक्य ऐकून चिपळूण परिसरातील वाशिष्ठी खाडीकिनार्‍याची स्थिती माहित असलेला कोणीही चमकेल, आनंदेल. काळात सोनगाव बंदरात हा सुखद धक्का पर्यावरण व पर्यटन चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्याना बसला. लॉकडाऊनमुळे जैवविविधता सध्या आनंदली, ही त्यांची ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया.

हेही वाचा- राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम -  हे मंत्री देणार स्वखर्चाने सरपंचांना विमा संरक्षण...

शिवल्यातून मिळते  कॅल्शिअम
खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी धक्का येथे गेल्यावर हा अनुभव आल्याचे पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शिवल्यातून कॅल्शिअम मिळत असलं तरी त्याला मांसाहारात मानाचं पान मिळालेलं नाही. शिवल्या खाडीतल्या खोल पाण्यात किंवा किनार्‍याला मिळतात. त्या गोलाकार जाळ्याने पाण्यातून मातीसकट पाण्यावर आणतात. माती चाळवून नेमक्या बाजूला गोळा करतात. शिवल्या सुरवातीला पाण्यात उकळतात. त्यामुळे त्या सुट्ट्या होतात, उघडल्या जातात. दोनपैकी एका बाजूला अधिक माष्ट (मांस) असते. दुसर्‍या बाजूचे माष्ट खरवडून घेतले जाते. काही ठिकाणी जास्त माष्ट असलेल्या शिवल्यांचे तसंच कालवण करतात. काही ठिकाणी त्यातले फक्त मांस (फ्लेश) कालवणासाठी, सुकं करण्यासाठी वापरतात.

हेही वाचा- सीमाभागातील विद्यार्थ्यांत संभ्रम  : एक डोळा स्क्रीनवर तर दुसरा निर्णयाकडे!

पावसाळ्याची बेगमी सुरु
क्वचित शिवल्याच्या आत छोटे खेकडेही मिळतात. पाण्यात उकडल्यानं शिवल्यांमधील प्रोटीन वाया जातात. पण तशाच कापणे सोपे नाही. काही लोक त्यांना स्वच्छ धुवून अर्धा तास पॅक डब्यात घालून डीप फ्रिझरमध्ये ठेवतात. अर्ध्यातासाने त्यांची तोंडे आपोआप उघडतात. ज्या शिवल्यात माती असते त्यांचे तोंड उघडले जात नाही असे जाणकार सांगतात. या शिवल्या बाहेरून जितक्या ओबडधोबड तितक्या आतून सुरेख निळसर, गुलाबी, पांढरी झाक असलेल्या असतात. एप्रिल / मे महिन्यात किंवा ऑक्टोबरात इतक्या मिळतात की घरोघरी याच शिजतात. सोनगाव भोईवाडीची सध्याची अवस्था तशी. शिवल्या पोत्यांनी आणून, उकडून, सुकवून पावसाळ्याची बेगमी म्हणूनही ठेवल्या जात आहेत.

मासेमारी प्रदूषणाने ग्रासलेली
 लोटे-परशुराम हे दाभोळच्या वाशिष्ठी खाडी किनार्‍यावरचे कोकणातले रासायनिक औद्योगिकीकरण झालेले केंद्र. रासायनिक कंपन्यातून निर्माण होणारे सांडपाणी याच खाडीत सोडले जाते. किनार्‍यावरच्या मच्छीमार समाजाचा मासेमारी हाच मुख्य व्यवसाय पण सध्या प्रदूषणाने ग्रासलेला. रसायन मिश्रित पाण्यामुळे माशांच्या प्रजननशक्तीवर परिणाम होऊन आता खाडीत मासळी मिळेनाशी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा अनुभव वेगळा ठरला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen years later they are getting Mussels