कोरोनाच्या लढ्यासाठी कोकणात शेतकर्‍यांनी लढवली ही युक्ती....

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदारांनी घाबरण्याचे कारण नाही. याला संयमाने तोंड दिले पाहिजे.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदारांनी घाबरण्याचे कारण नाही. याला संयमाने तोंड दिले पाहिजे. एकदम आंबा मार्केटमध्ये गेला तर भाव कोसळतील, व त्यासाठी दलाल अगतिक असतील. त्यावर मात करण्यासाठी थेट आंबा विक्रीची योजना राबवण्याची कल्पना माजी आमदार बाळासाहेब माने यांनी मांडली आहे. याकरिता पुरेशी काळजी घेऊन वाहतुकीपासून थेट ग्राहकापर्यंत विक्री व्यवस्थेची 2 एप्रिलनंतर ही योजना राबवण्यासाठी शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्या गुढीपाडवा (ता. 25) असून याच मुहुर्तावर शुभारंभ करतात, म्हणून ही संकल्पना श्री. माने यांनी मांडली. कोरोनाला रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. त्यानंतर ही योजना अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येईल. त्याकरिता मुंबईच्या नातेवाइक मंडळींनी मदत करावी.

हेही वाचा- Photo : सागर वेळीच कुटुंबाला बाहेर घेऊन गेला म्हणून बरं नाहीतर....

थेट विक्रीचा मार्ग
खोक्यांमधून (कार्टून) एक व दोन डझन आंबा विक्रीच केली जाणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक आदी महापालिकांच्या क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबवला जाईल.गेली अनेक वर्षे दलालांच्या माध्यमातून कोकणातील आंबा विक्री होतो. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भरपूर आंबा बाजारात गेल्यास दर पाडण्याचा धोका आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना थोडासा दिलासा मिळण्याकरिता थेट विक्रीचा मार्ग आहे. यातून शेतकर्‍यांनाही रोखीने पैसे मिळतील.

 हेही वाचा- भारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..

आंबा उत्पादकांनी हे करावे

आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी बागेतून काढलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवून रंग बदलला की द्यावा. कोणत्याही केमिकलमधून पिकवून देऊ नये. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुरेशी काळजी घ्यावी. आंबा, खोकेही निर्जंतुक असावेत. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने आणि दादा केळकर यांच्याकडे संपर्क साधावा. आंबा उत्पादक, बागायतदारांच्या सूचना स्वागतार्ह आहेत, त्याचा नक्की विचार करू, असे बाळ माने यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight with coronaviras farmer in ratnagiri kokan marathi newsin ratnagiri kokan marathi news