
जुलै महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील शासनाच्या झाडे लावा योजनेचा शुभारंभ मार्लेश्वर देवस्थानच्या याच जागेत करण्यात आला होता
पार्किंगसाठी 400 झाडांना लावली आग ?
साडवली ( रत्नागिरी ) - श्री देव मार्लेश्वर कल्याणविधी सोहळा यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची साफसफाई करण्यात आली. त्यावेळी या परिसरातील 400 झाडे जळून खाक झाली. ही आग लागली की लावण्यात आली, असा प्रश्न विचारला जात आहे.
जुलै महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील शासनाच्या झाडे लावा योजनेचा शुभारंभ मार्लेश्वर देवस्थानच्या याच जागेत करण्यात आला होता. वनविभाग, लाकूड व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने व मार्लेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने 1200 झाडे लावली गेली. यावेळी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन असा बॅनरही होता. पार्किंग जागेत झाडे लावताय, पुढे यात्रेवेळी त्रास होईल, असे सांगितले असता योग्य जागा सोडूनच झाडे लावली जाणार असल्याचे ट्रस्टी सुनील लिंगायत यांनी देवस्थानच्या वतीने सांगितले होते.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची येथे होणार हकालपट्टी
वृक्ष लागवडीवेळी वनपाल सुरेश उपरे, किरण जाधव, युयुत्सु आर्ते उपस्थित होते. 1200 झाडे लावण्यात आली होती. मार्लेश्वर यात्रा 14 व 15 ला असताना चारचाकी वाहनांची पार्किंग सोय करताना गवत काढण्याऐवजी ते जाळून टाकण्यात आले. त्यामुळे ही आग लागली की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत सुनील लिंगायत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ नाही.
हेही वाचा - जिल्हा परिषद विषय समितीत रत्नागिरीला दोन पदे
झाडांसाठी बांधणार होते बंधारा
ही झाडे लावत असताना डिसेंबरनंतर या झाडांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून धारेश्वर धबधबा नदी प्रवाहात बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात हा बंधारा सर्वांच्या सहकार्याने बांधला जाणार होता. आता झाडेच जोपासली जाणार नसतील तर बंधारा बांधायचा कशाला असा विचार पुढे आला आहे.
या घटनेला जबाबदार कोण ?
श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानने पुढाकार घेवून देवस्थानच्या मालकीच्या जागेत 1200 झाडे विविध संस्था, नागरीक, शालेय विद्यार्थी यांच्या श्रमदानाने लावली गेली. यात्रेसाठी या जागेतील नुसते गवत काढायचे होते. मात्र मजुरी वाचविण्यासाठी गवताला आग लावली गेली व चारशेहून अधिक झाडे होरपळली हे देवस्थानच्या लक्षात कसे आले नाही. या घटनेला जबाबदार कुणाला धरायचे? झालेला खर्च कोण सोसणार? याचे उत्तर देवस्थानला द्यावेच लागेल.
- युयुत्सु आर्ते, सामाजिक कार्यकर्ते, देवरूख