मत्स्य हंगामाचा पहिला टप्पा सुकर; मालवणात चांगली कॅच

मत्स्य हंगामाचा पहिला टप्पा सुकर; मालवणात चांगली कॅच

मालवण - अनधिकृत पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सवर झालेल्या कारवाईमुळे यंदाच्या मत्स्यहंगामात मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली. परप्रांतीयांकडून होणारी लूट बऱ्याच प्रमाणात थांबल्याने चांगली वाढ झालेली मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागली. मासळीची चांगली कॅच झाली; तरी त्याचे दर गगनाला भिडणारे असल्याने मच्छीमारांना समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळाले आणि मत्स्य खवय्यांनाही चांगल्या मासळीचा आस्वाद लुटता आला. 

एकंदरीत यंदाच्या मत्स्य हंगामाचा पहिला टप्पा संघर्षविरहित राहिल्याने मच्छीमारांना त्याचा चांगला फायदा झाला.
गेल्या काही वर्षे स्थानिक पारंपरिक, परप्रांतीय अनधिकृत हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सधारक यांच्यातील संघर्षातच मत्स्यहंगाम संपून जात होता. शिवाय मत्स्यहंगामात सातत्याने परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी होत असल्याने स्थानिक मच्छीमारांवर मासळीअभावी उपासमारीचे संकट ओढवले होते. शिवाय समुद्रात मासेमारीस गेलेल्या मच्छीमारांना पूर्ण वाढ न झालेली मासळी जाळ्यात मिळत असल्याने त्याला चांगला दरही मिळत नव्हता. 

अनधिकृत पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईसाठी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केलेल्या संघर्षामुळे अखेर शासनाने पर्ससीन, हायस्पीडची घुसखोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबविली. अनधिकृत हायस्पीड, पर्ससीनवर झालेल्या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांना चांगल्या व किमती मासळीचे उत्पन्न मिळाले.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळाली. यात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण वाढ झालेली मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागल्याने मच्छीमारही सुखावला. या मासळीला चांगला दरही मिळत होता. मासळीचे चांगले उत्पन्न मिळू लागल्याने यावर्षी मच्छीमारांनी गिलनेट पद्धतीच्या मासेमारीवर भर दिल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मिनी पर्ससीनपेक्षा गिलनेट पद्धतीनेच चांगली मासेमारी झाल्याचे पाहावयास मिळाले. 

मासेमारी हंगामातील पहिला टप्पा संघर्षविरहित राहिल्याने मासेमारीबरोबर अन्य रोजगारांतही सातत्य राहिल्याने अनेकांना चांगला रोजगार मिळाला. रापणकर मच्छीमारांसाठीही हे वर्ष समाधानकारक राहिले. तारली, कोळंबीसह अन्य किमती मासळी जाळ्यात मिळाल्याने रापणकर मच्छीमारांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले. रापण पद्धतीने होणाऱ्या मासेमारीतून दैनंदिन रोजगार मिळत असल्याने तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील युवकही रोजगारासाठी रापण व्यवसायात उतरल्याचे दिसून आले.

शासनाने पर्ससीन, हायस्पीडची अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजनांमुळे वर्ष मच्छीमारांना दिलासा देणारे ठरले. काही वर्षांच्या तुलनेत यंदा मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली आहे. परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीत पूर्ण वाढ न झालेली मासळी पकडली जात असल्याने मच्छीमारांवर संकट ओढवले होते; मात्र कारवाईत सातत्य राहिल्याने जाळ्यात पूर्ण वाढ झालेली मासळी मिळत आहे. रापण मासेमारीतून रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील युवकांचा सहभाग वाढत आहे.
- महेंद्र पराडकर, 

मत्स्य अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com