आवक घटल्याने सिंधुदुर्गात मासा महागला 

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मालवण - उत्तरेकडील (उपरच्या) वाऱ्याचा जोर वाढल्याचा विपरीत परिणाम मासेमारीवर झाला आहे. वाऱ्यामुळे मच्छीमार मासेमारीस जात नसल्याने मासळीची आवक घटली आहे. परिणामी मिळणाऱ्या मासळीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे.

मालवण - उत्तरेकडील (उपरच्या) वाऱ्याचा जोर वाढल्याचा विपरीत परिणाम मासेमारीवर झाला आहे. वाऱ्यामुळे मच्छीमार मासेमारीस जात नसल्याने मासळीची आवक घटली आहे. परिणामी मिळणाऱ्या मासळीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. पर्यटन हंगामास सुरवात झाल्याने मत्स्यखवय्यांना मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. 

गेले काही दिवस उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे काही ठराविक मच्छीमारच समुद्रात मासेमारीसाठी जात असल्याचे दिसून येत आहे. वाऱ्यामुळे मासळी मिळण्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मासेमारीसाठी काही ठराविक मच्छीमारच समुद्रात जात असून, त्यांना किंमती मासळी काही प्रमाणातच मिळत आहे. गेले काही दिवस मासळीची आवक घटल्याने मासळीच्या दर चढे आहेत. 

सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली आहे; मात्र मत्स्य खवय्या पर्यटकांना मासळीची आवक घटल्याने किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने त्यांच्या खिशाला चाट पडत आहे. मासळीच्या दरात वाढ झाल्याने मत्स्य थाळ्यांच्या दरातही वाढ झाली आहे. तरीही मत्स्य खवय्यांकडून जादा पैसे मोजून या मासळीचा आस्वाद लुटला जात आहे. 

गोवा शासनाने जिल्ह्यातील मासळीच्या वाहतुकीवर घातलेली बंदी उठविल्याने सध्या जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातून मासळीची निर्यात गोव्यात केली जात आहे. गोव्यात इयर एडिंगला पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मासळीची आयात केली जाते. आवक कमी झाल्याने मासळीचा भाव वधारला असून, ही मासळी गोव्यात पाठविली जात आहे. उत्तरेकडील वाऱ्याचा जोर आणखी काही दिवस असाच राहणार असल्याने मासळीची आवक कमी राहणार आहे. 

दर आणखी वाढण्याची शक्‍यता 
मालवणात सध्या सुरमई 700 रुपये किलो, पापलेट 900 ते 1200 रुपये, बांगडा 1 हजार रुपये टोपली, छोटी कोळंबी 100 रुपये किलो, मोठी कोळंबी 500 रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. आवक चांगली असते तेव्हा सर्वसाधारण सुरमई 500 रुपये किलो, पापलेट 700 ते 1000 रुपये, बांगडा 800 रुपये टोपली असा दर असतो. छोट्या आणि मोठ्या कोळंबीच्या दरात मात्र फारसा फरक झालेला नाही. मासळीचा दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

पर्यटन व्यावसायिक चिंतेत 
स्थानिक बाजारपेठेत वर्षअखेर आणि नववर्ष कालावधीत सर्वाधिक पर्यटक येतात. या काळात मासळीला चांगला दर मिळतो. याचवेळी आवक कमी असली तर मासळीचा आणि पर्यायाने जेवणाचा दर वधारतो. सध्या मालवणात पर्यटन हंगामाची चाहूल लागली आहे. याच काळात आवक कमी झाल्याने पर्यटन व्यवसायीक चिंतेत आहे.  

Web Title: fish rate increases due to less inward