निवडणुकीवर मच्छीमारांचा बहिष्कार

निवडणुकीवर मच्छीमारांचा बहिष्कार

हर्णै - संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवांनी एलईडी फिशिंगविरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे. 

राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लवकरात लवकर या अवैध मासेमारीविरोधात कारवाई न केल्यास मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतचे सर्व पारंपरिक मच्छीमार या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दोन दिवसांत याबाबत हर्णै बंदरात महासभा होणार आहे. महासभेला संपूर्ण किनारपट्टीलगतचा पारंपरिक मच्छीमार उपस्थित राहणार आहे. 

दोन दिवसांपूर्वी गुहागरमध्ये हर्णै, दाभोळ, गुहागर येथील मच्छीमारांनी एलईडी फिशिंग करणारी नौका पकडून दिली होती. तरीही शासनाचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे एलईडी मासेमारीविरोधात किनारपट्टीला रानच पेटले आहे. बंदी असूनही राजरोसपणे मासेमारी सुरू आहे. जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी २६ जानेवारी रोजी उपोषणही केले होते. एलईडी फिशिंगमुळे मासळी नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हर्णै बंदरात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे नौकांवरील खलाशांचा खर्च अंगावर पडत आहे. अनेक वेळा आंदोलन, मोर्चा, निवेदन देऊनही या विषयावर शासन ठोस निर्णय घेत नाही. बिनधास्तपणे एलईडीद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांची उपासमार होत आहे. ही मासेमारी कायमची बंद झालीच पाहिजे, अन्यथा लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. 

शासनाने वेळीच लक्ष न घातल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील नाखवा संघटनेने घेतला आहे. मच्छीमार आता सहन करणार नाहीत. आम्ही सर्व कोकण किनारपट्टीलगतचे मच्छीमार यामध्ये सामील आहोत, असे स्थानिक मच्छीमार शैलेंद्र कालेकर यांनी सांगितले.

‘‘एलईडी फिशिंगमुळे किनारपट्टीलगतचा मच्छीमार मेटाकुटीस आला आहे. दोन ते तीन दिवसांत हर्णै बंदरामध्ये सर्व मच्छीमारांची महासभा आयोजित करण्यात येणार आहे. हा निर्णय दापोली, मंडणगड, गुहागर तालुका मच्छीमार संघटनेचा आहे. यामध्ये किनारपट्टीलगतचे सर्व पारंपरिक मच्छीमारांचा समावेश आहे.’’
- प्रकाश रघुवीर,
उपसरपंच आणि मच्छीमार, हर्णै
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com