सरकारविरोधात मतदान करण्याचा मच्छिमारांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

हर्णै - मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकणातील तीन जिल्ह्यांतील मच्छीमार प्रतिनिधींच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हर्णै - मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकणातील तीन जिल्ह्यांतील मच्छीमार प्रतिनिधींच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २९ मार्चला हर्णै बंदर येथे झालेल्या बैठकीतही सरकारने एलईडी पर्ससीन नेटचा प्रश्न न सोडविल्यास सर्व पारंपरिक मच्छीमार समाज सरकारविरोधात मतदान करेल असे ठरविण्यात आले. त्यासाठी सरकारला सोमवारपर्यंत (ता. १ एप्रिल) अल्टीमेटम देण्यात आला आहे. 

पाजपंढरीमध्ये १७ मार्चला महासभा झाली होती. यावेळी एलईडीविरोधात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीसंदर्भात तीन जिल्ह्यांची समन्वय समिती गठित करून काय तो निर्णय घेतला जाईल, असे ठरले होते. १ एप्रिलपर्यंतच्या दिलेल्या मुदतीत सरकारने एलईडी पर्ससीन नेट मासेमारी पूर्ण बंद न केल्यास मच्छीमार समाज सरकारच्या विरोधात मतदान करून सरकारच्या विरोधातली नाराजी दाखवून देईल, असा निर्णय पारंपरिक मच्छीमारांनी घेतल्याची माहिती येथील मच्छीमार विष्णू तबीब यांनी दिली.

गेले २ ते ३ वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने एलईडी पर्ससीन नेट नौकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तसेच अधिकारीही या प्रश्नांची दखल घेत नाहीत. त्यामुळे मच्छीमारांच्या मनात अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल शंका उपस्थित होत आहे. तसेच डिसेंबरनंतर पर्ससीन नेट वापरण्यास बंदी असतानाही पर्ससीन नेट नौकांवर अधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी त्यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तबीब यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishermens warning to vote against the government