केरळातील वादळामुळे कोकणात मच्छीमारी ठप्प

राजेश कळंबटे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांची फटका बसला आहे.

रत्नागिरी - केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांची फटका बसला आहे. सुरवातीपासूनच मच्छीमारी हंगामावरील वादळाचे सावट कायम राहिले आहे. वेगवान वार्‍यामुळे समुद्र खवळला असून आणखीन चार दिवस हेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले तीन दिवस कोळंबी, लेप, पापलेट, आणि बांगडा मिळत होता; त्यानंतर लगेचच वातावरणात बदलले. अनेक नौका बंदरात परतल्या. मासे अंडी घालण्यासाठी पावसाळ्यात किनार्‍यावर येतात. या कालावधीत मासेमारी बंद ठेवली जाते. जुन, जुलै, ऑगस्टमध्ये मासळी किनारी भागातच सापडते. शासन आदेशानुसार 1 ऑगस्टला बंदी उठल्यावर मच्छीमार किनार्‍यापासून जवळच मासेमारी करतात.

भविष्यात मासळी पाण्याच्या प्रवाहांबरोबर पुढे सरकते. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी स्पर्धा असते. याच काळात पाऊस, वादळाचा सामनाही करावा लागतो. वादळामुळे अनेकवेळा मासेमारी बंद ठेवावी लागते.

मिरकरवाडा, हर्णै या बंदरात कोट्यावधीची उलाढाल होते. परंतु गेल्या पाच दिवसात वातावरण खराब राहिल्याने उलाढाल थांबली आहे. पाण्याला करंट असल्यामुळे मच्छीमारांनी किनार्‍यावरच राहणे पसंत केले आहे. दापोलीतील शेकडो नौका जयगड बंदरात उभ्या होत्या. मच्छिमारी थांबल्याने लिलाव प्रक्रिया थांबली आहे. मच्छीमारही धोका पत्करून समुद्रात जाण्यास तयार नाहीत. नौकांची ये-जा थांबल्याने बंदरांवरही शुकशुकाट आहे.

परंपरा कायम

नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करुन मासेमारीला पुर्वी सुरवात केली जात होती. शासनाच्या नियमानुसार 1 ऑगस्टला मासेमारी बंदी उठली. तरीही पारंपरिक पध्दतीप्रमाणेच 22 ऑगस्टला बहूतांश मच्छीमार समुद्राकडे रवाना होणार आहेत.

केरळ, कर्नाटक, गुजरातमधील अनेक मच्छीमारी नौका महाराष्ट्रात विविध ठिकाणी किनार्‍यावर आल्या आहेत. वादळी वातावरणामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांनी बंदरात थांबणेच पसंत केले आहे.

- पुष्कर भुते, मच्छीमार

Web Title: fishing affected due to storm in Kerala