रत्नागिरीत पाच डझनाच्या पेटीला इतका दर

Five Dozen Mango Box In Ratnagiri At 1700
Five Dozen Mango Box In Ratnagiri At 1700

रत्नागिरी - कोरोनामध्ये रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला प्रारंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आंबे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते, तर पाच खरेदीदारांनी येथे हजेरी लावली. भविष्यात यामध्ये वाढ होईल अशी आशा जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी व्यक्‍त केली. 

कोरोनामुळे स्थानिक स्तरावर आंबा खरेदी-विक्री केली जावी यासाठी उपनिबंधक कार्यालयाने उपक्रम हाती घेतला होता. रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आतापर्यंत प्रक्रियाच झाली नव्हती. सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन दोन वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. ती जागा भाजीपाला लिलावासाठी वापरण्यास सुरवात झाली.

कोरोनामुळे वाहतुकीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा आंबा खरेदी-विक्री प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 3 वाजता ही प्रक्रिया झाली. अनेक बागायतदारांना याची माहिती नसल्यामुळे त्यांनी आंबा आणण्याऐवजी हजेरी लावणे पसंत केले. तर प्रचार, प्रसार केल्यामुळे काही बागायतदारांनी दूरध्वनीवरुन विचारणा केली.

तीन बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी बागायतदार आणि खरेदीदार यांच्यात दर निश्‍चित करून खरेदी प्रक्रिया पार पडली. या वेळी पाच खरेदीदार उपस्थित होते. पाच आंबा पेटी, पाच क्रेट लूज माल तर पिकलेल्या आंब्यांचे बॉक्‍स ठेवले होते. पाच डझनची पेटी सरासरी 1700 रुपयांनी विक्रीला काढली गेली, तर सात क्रेटचे सात हजार रुपये आले. त्या एका तासामध्ये सुमारे पंधरा हजार रुपयांची खरेदी-विक्री झाली. या वेळी पणनचे अधिकारी मिलिंद जोशी, बाजार समिती सचिव किरण महाजन, उपसभापती अनिल जोशी, माजी सभापती दत्तात्रय ढवळे, आंबा बागायतदार राजू पेडणेकर, प्रसन्न पेठे उपस्थित होते. 

सतत सुरू ठेवणार 
ही प्रक्रिया सतत सुरु राहणार असल्याने बागायतदारांनी बाजार समितीच्या लिलावगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीतर्फे किरण महाजन यांनी केले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com