रत्नागिरीत चोरट्यांनी घातलाय धुमाकुळ : बंद फ्लॅट फोडून पावणे पाच  लाखांची रोकड लंपास

राजेश कळंबट्टे
Monday, 21 September 2020

जिल्हा बंदी उठताच चोरट्यांची टोळी सक्रिय

रत्नागिरी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेली जिल्हा बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा चोरटे शहरात सक्रीय झाले आहेत.रत्नागिरी शहरातील जोशी पाळंद येथील दीपक शहा यांचा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी ४  लाख ६० हजार रुपये लंपास केले आहेत. रविवारी रात्री ही चोरीची घटना उघड  झाली.

हेही वाचा- संकटांची श्रृखंला संपेना, काजू बागायतदार चिंतेत -

रत्नागिरी शहरातील सुभाष रोड वरील जोशी पाळंद येथे राहणारे दीपक शहा हे आपल्या कुटुंबीयांसमवेत दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून रविवारी रात्री ते रत्नागिरी शहरात दाखल झाले. त्यावेळी त्यांना फ्लॅटचा कडी-कोयंडा तुटलेला असल्याचे लक्षात आले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर कापटातील सुमारे ४ लाख ६० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.बेडरूममधील कपाटात पैसे असल्याच्या शक्यतेने चोरट्यांनी आजूबाजूच्या परिसरात चावीचा शोध घेतला. कपाटाची चावी  बेडरूममध्ये असल्याने चोरट्यांनी चावीच्या सहाय्याने कपाट उघडून आतील रोकड घेऊन पोबारा केला.

हेही वाचा- नूतनीकरण प्रस्ताव धूळखात; सरमळे पूल मोजतोय शेवटची घटका -

 रविवारी रात्री दीपक शहा हे कुटुंबासमवेत घरी परतल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर रात्री उशिरा  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते.चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नव्याने बसवलेल्या कॅमेऱ्याची फूटेज तपासण्याचे काम सुरू केले होते. तर दीपक शहा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh cash lampas to break into a closed flat crime case in ratnagiri