रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न धूसरच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

वाढीव धावपट्टीला जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे रत्नागिरी विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न धूसर झाले आहे. तटरक्षक दलाच्या येथील विमानतळावरून सुरू होणाऱ्या खासगी विमानसेवा निकषांमध्ये अडकण्याची शक्‍यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेसेवेमुळे मुंबई चार तासांच्या अंतरावर येईल. मात्र, वाढीव धावपट्टीला जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे रत्नागिरी विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. याला खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. 

हेही वाचा - चिठ्ठीत उद्धव ठाकरे तुमचंही नाव आलंय, स्वतःला अटक करून घेणार का ? निलेश राणेंचा प्रश्न -

रत्नागिरीतील हवाई वाहतुकीची भरारी आता दूर नाही, लवकरच ही हवाई सेवा सुरू होणार, असे वारंवार लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात होते. तटरक्षक दलाच्या तळाचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात दलाची विमाने येथे लॅण्ड होतील त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन दोन महिन्यांत खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल, असे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते.

पूर्वी रत्नागिरी-मुंबई ही हवाई सेवा सुरू होती, मात्र ती बंद पडली. तेव्हा एमआयडीसीच्या ताब्यात रत्नागिरी विमानतळ होता, मात्र आता हे विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोकणातील मोठा तळ येथे उभारला जात आहे. या ठिकाणी विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी वाढविण्याची गरज होती. काही कोटी रुपये खर्च करून तटरक्षक दलाच्या या तळाचे विस्तारीकरण सुरू आहे, मात्र वाढीव धापट्टीला स्थानिकांनी संमती न दिल्याने हे काम रखडले आहे. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा -  खवल्यांच्या विक्री प्रयत्नात राजकीय पुढार्‍याचाच हात -

मुंबई चार तासांवर येणार 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबई चार तासांवर येईल. रेल्वेमुळेही हे अंतर कमी झाले आहे. शॉर्ट डिस्टन्स झाल्याने रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी झाली. त्यात सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. याचा सारासार विचार करून रत्नागिरी विमानतळावर खासगी सेवा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flight service of ratnagiri people less possibilities from flight travel said MP vinayak raut in press conference of ratnagiri