तब्बल चार तासानंतर जगबुडी पुलावरील वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

रत्नागिरी -  मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. त्यामुळे खेड येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्ग बंद झाला होता. तब्बल चार तासांनी पूर ओसरल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास जगबुडी पुलावरील वाहतूक सुरू झाली. 

रत्नागिरी -  मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. त्यामुळे खेड येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्ग बंद झाला होता. तब्बल चार तासांनी पूर ओसरल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास जगबुडी पुलावरील वाहतूक सुरू झाली. 

मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. वाशिष्ठी, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे चिपळूण शहरात पाणी घुसले. खेड बाजारपेठेसह परिसरातील घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला.  

सोमवारी (ता. 15) सकाळी साडे आठवाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 59.78 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 145, दापोली 31, खेड 110, गुहागर 22, चिपळूण 135, संगमेश्‍वर 14, रत्नागिरी 1, लांजा 32, राजापूर 48 मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर सोमवारीही कायम होता.

रत्नागिरी - गुहागर मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द करंजीकर मोहल्ला येथील दरड कोसळल्याने दहा घरांना धोका निर्माण झाला आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मंजूर परकार, अली परकार, सुलतान परकार, हलीमा अब्दुल कादिर परकार, सल्लादिन परकार, नजीर परकार, फईन परकार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये हलीमा अब्दुल कादिर परकार या जखमी झाल्या आहेत. त्यांना मातीच्या ढिगार्‍यातून वाचवण्यासाठी अमिन अब्दुल कादिर बिजले व नंदकिशोर गुढेकर यांनी प्रयत्न केले.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दरड उपसण्याचे काम सुरु होते. खेड चिंचघरी येथे पाणी भरल्यामुळे सती अडरे अनारी मार्ग बंद ठेवल्याने वाहतूक ठप्प होती. संगमेश्‍वर बाजारपेठेसह माखजन परिसरातील पाणी भरले होते. रत्नागिरी-गुहागर मार्गावर मोठा दगड आल्यामुळे वाहतूक ठप्प होती. येथील रस्ताही खचला असून वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. येथील काही जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Khed Taluka Mumbai Goa Highway blocked