esakal | कोकणात दमदार सरींचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

कोकणात दमदार सरींचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकण आणि पूर्व विदर्भात या आठवड्यात पावसाच्या दमदार सरी पडतील, तर उर्वरित राज्यात बहुसंख्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. हवामान खात्याने १० ते १६ सप्टेंबरदरम्यानचा पावसाचा अंदाज वर्तविला. त्यात ही माहिती देण्यात आली.

राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पाऊस सरासरीपर्यंत वाढला. राज्यात सध्या हलक्या सरी पडत असून, १० ते १६ सप्टेंबर या आठवडाभरात कोकण, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित राज्यात बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे पावसाळ्याचा शेवटचा महिन्यात पडणाऱ्या पावसाकडे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमिवर हवामान खात्याने अंदाज जाहीर केला.

हेही वाचा: 'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस आणि हवेच्या वरच्या थरात असलेली परस्परविरोधी वाहणाऱ्या वाऱ्यांची स्थिती या प्रणालीपूरक ठरल्याने गेल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होते.

राज्याच्या सर्वच भागत २ ते ८ सप्टेंबर या कालावधी सर्वच हवामान उपविभागांत चांगला पाऊस झाला आहे. यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. बीड जिल्ह्यात तेथील सरासरीच्या ६१ टक्के जास्त पाऊस पडला. जालना जिल्ह्यात ही टक्केवारी ६५ पर्यंत आहे. त्यामुळे बीड आणि जालना हे राज्यातील दोनच जिल्हे असे आहेत, की जेथे सरासरीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस पडला. नंदूरबार, गोंदीया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

घाटमाथ्यावर मुसळधार

शहराच्या परिसरातील घाटमाथ्यांवर पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात हवामान खात्याने पावसाचा ‘यलो अलर्ट’ शुक्रवारी दिला.शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांमध्ये ८.५ मिलिमीटर पाऊस पडला. लोहगाव येथे ८.८ आणि पाषाण येथे ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरात १ जून ते १० सप्टेंबर दरम्यान सरासरी ४६४.३ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी ४३७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २६.९ मिलिमीटर पाऊस कमी झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गेल्या महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने सरासरीपेक्षा ५० मिलिमीटरपर्यंत कमी पाऊस पडल्याचे चित्र होते. गेल्या आठवड्यातील पावसामुळे ही तूट भरून निघाली.

हेही वाचा: 'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, कमी दाब क्षेत्र, तिकमगड, परादीप ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राजस्थान आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (ता. ११) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे.

loading image
go to top