डुकरांच्या शिकारीचा व्हिडिओ केला व्हायरल अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

रानडुकरांची शिकार करून त्याचे सोपस्कार पूर्ण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने याची गंभीर दखल वनविभागाने घेत रानडुकरांची शिकार करणाऱ्या सुरेश रामचंद्र मापारी व राजाराम अंकुश नेरुरकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली.

मालवण ( सिंधुदुर्ग ) : रानडुकरांची शिकार करून त्याचे सोपस्कार पूर्ण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने याची गंभीर दखल वनविभागाने घेत आज पहाटेच सुरेश रामचंद्र मापारी (वय 56, रा. वेरळ), राजाराम अंकुश नेरुरकर (नेरकर) (वय-58 रा. विरण) या दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना कुडाळ येथील पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्यांची नावे तपासात पुढे येतील त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे मटण साफ केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे दिसून आला. याची माहिती काल (ता.27) वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपास कामास सुरवात केली.

वनविभागाकडून दोघेजण ताब्यात

आज पहाटे रानडुकरांची शिकार करणाऱ्या सुरेश रामचंद्र मापारी व राजाराम अंकुश नेरुरकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 30 नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच तालुक्‍यात एकच खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे होणार जप्त 

वेरली येथील एका विहिरीत 14 रानडुकरे पडली होती. शिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारले. त्यानुसार संशयित दोन शिकाऱ्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे जप्त केली जाणार आहेत. शिवाय तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबतचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department Action On Pig Hunting Viral Video