दापोली मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा : संजय कदम

चंद्रशेखर जोशी
Wednesday, 23 September 2020

राष्ट्रवादी, मनसे आघाडीवर; रोडगे यांच्यावर गंभीर आरोप, २८ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायतीच्या माध्यमातून बेकायदेशीर कामे व बेकायदेशीर ठराव करून शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा, २८ सप्टेंबरपासून सर्व दापोलीकर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना निवेदनाद्वारे दिला.
 

दापोली नगरपंचायतीच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी, मनसे व शिवसेनेचा दळवी गट आक्रमक झाला असून, आज मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत एक निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना दिले. या निवेदनात दापोली नगरपंचायतीचे अभियंता सुनील सावके यांना नगरपंचायतीमध्ये अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बडतर्फ केले होते.

मात्र, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सत्ताधारी सदस्यांना हाताशी धरून सावके यांना संख्याबळाच्या जोरावर नगरपंचायतीच्या सभेत ठराव करून पुन्हा कामावर हजर करून घेतले. दापोली शहरामध्ये नगरपंचायतीच्या मालकीची डंपिंग ग्राउंडसाठी सहा एकर जागा असताना व डीपी प्लॅनमध्ये डंपिंग ग्राउंडकडे जाण्यासाठी प्रस्तावित रस्ता असताना त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाची तिजोरी रिकामी असतानाही सत्ताधारी व मुख्याधिकारी यांनी करोडो रुपयांची जागा खरेदीचा ठराव काल (ता. २१) झालेल्या सभेत मंजूर केला. 

हेही वाचा- नाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार -

पथविक्रेता धोरण राबविताना जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकी असलेल्या जमिनीत त्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर खोके उभारले आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याविरोधात या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास २८ सप्टेंबरपासून दापोलीकर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. दापोलीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव, रवींद्र क्षीरसागर, खालिद रखांगे, नम्रता शिगवण, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, मनसेचे शहराध्यक्ष राकेश माळी, साईराज देसाई, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन मयेकर, मंगेश शिंदे, ऋषीकेश गुजर यांच्यासह अन्य निवेदन देताना उपस्थित होते.

काय आहेत आरोप..?
  दोषी अभियंत्यांना कामावर हजर करून घेतले
  करोडो रुपयांची जागा खरेदीचा ठराव केला मंजूर
  विनापरवानगी बेकायदा खोके उभारले, पैसे घेतले

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Sanjay Kadam agtion Gesture