"अजितदादा राजकारण सोडून शेती कधी करताय"?

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 16 December 2020

अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण निलेश राणे यांनी करुन दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण निलेश राणे यांनी करुन दिली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी टि्वट करून अजितदादांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?? अशी जहरी टीका  भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे.  राणे यांनी ट्विट करून ही टिका केली आहे. याआधी शिवसेना त्यांच्या निशाण्यावर असायची. अलिकडे राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यावरही ते टिका करताना दिसत आहेत.

 २८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांचे हे हळवे रूप महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितले. कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांनी चार गोष्टी सुनावल्यामुळेच अजितदादांना नरमाईची भूमिका घेत २९ सप्टेंबरला पुन्हा मुंबई गाठली. त्यानंतर या राजीनामा प्रकरणावर पडदा पडला.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या काही आठवडे आधीच २०१९च्या सप्टेंबर महिन्यात अजितदादांनी २७ सप्टेंबरला  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लगेचच स्वीकृत केला. राजीनाम्यानंतर अजितदादांचा कुणाशीच संपर्क झाला नव्हता. या राजीनाम्या संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणी घसरणारी पातळी पाहून अजितने आपल्या मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं होतं.हाही संदर्भ या ट्विटशी जोडला गेला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former mp nilesh rane criticize on Deputy Chief Minister Ajit Pawar