सिंधुदुर्गातील चौघे 70 लाखांसह ताब्यात?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पणजी : चोर्ला- केरी घाटदरम्यान आज प्राप्तिकर विभागाने सुमारे 70 लाखांची रोकड पकडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी सिंधुदुर्गातील चौघांना ताब्यात घेतल्याचे समजते. ही कारवाई बंगळूर (कर्नाटक) येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केल्याची माहिती गोव्याच्या प्राप्तिकर विभागाने दिली.

पणजी : चोर्ला- केरी घाटदरम्यान आज प्राप्तिकर विभागाने सुमारे 70 लाखांची रोकड पकडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी सिंधुदुर्गातील चौघांना ताब्यात घेतल्याचे समजते. ही कारवाई बंगळूर (कर्नाटक) येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केल्याची माहिती गोव्याच्या प्राप्तिकर विभागाने दिली.

याबाबत अधिकृत माहिती पोलिस किंवा प्राप्तिकर विभागाकडून मिळाली नाही; मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्गातील चौघे जण एका मोटारीतून चोर्ला घाटमार्गे कर्नाटककडे जात होते. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्या गाडीत नव्या चलनाची सुमारे 70 लाखांची रोकड सापडली. हा सगळा पैसा कोणत्या तरी आर्थिक व्यवहारासाठी नेला जात असावा, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर सर्वत्र झळकले. या प्रकरणी एकाच शहरातील चौघांना ताब्यात घेतल्याचे समजते.

याबाबत पणजी पोलिसांशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही नोंद गोव्यातील पोलिसांकडे नसल्याचे सांगण्यात आले. गोवा प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधला असता ही कारवाई आम्ही केलेली नाही, ती बंगळूरमधल्या पथकाने केल्याची माहिती मिळत आहे. आपल्याकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

नेमकी रक्कम किती?
या छाप्याबाबत विविध विभागांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली; मात्र नेमकी रक्कम किती पकडली याबाबत उलट-सुलट चर्चा होती. काहींच्या मते पावणेदोन कोटींची रक्कम पकडण्यात आली. ही रक्कम नेमकी कोणत्या व्यवहाराची होती, याबाबतही उलट-सुलट चर्चा आहे. शिवाय इतक्‍या मोठ्या प्रमाणात नव्या चलनातील नोटा आल्या कशा, याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: four caught with 70 lac in sindhudurg