आंबा घाटामध्ये चार बोगदे बांधणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गांतर्गत रत्नागिरी-कोल्हापूरमधील आंबा घाटात चार बोगदे बांधण्यात येणार आहेत.

यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. कोकण-विदर्भ जोडणाऱ्या या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी रत्नागिरी ते कोल्हापूर या टप्प्यात भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला. एक वर्षानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. 

हा महामार्ग कोल्हापूर शहरातून न नेता चोकाक ते शिये असा नवीन रस्ता करण्यात येणार आहे. त्यानंतर शिये ते केर्ले हा मार्ग वाघबीळ, पन्हाळा रस्त्याला जोडला जाणार आहे. आंबा घाटात चार बोगदे करण्यात येणार आहे. एक किलोमीटरचे दोन बोगदे, तिसरा बोगदा पावणेदोन किलोमीटरचा तर सर्वात मोठा चौथा बोगदा साडेतीन किलोमीटरचा होणार आहे. मार्गावर येणाऱ्या प्रत्येक नदीवर मोठा पूल, ओढ्यावर छोटे पूल केले जाणार आहेत. 

सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून या रस्त्यांच्या कामांवर देखरेख केली जात आहे. या महामार्गाअंतर्गत सर्व राज्य मार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे वर्ग केले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत या मार्गासाठी प्रयत्न केले गेले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. 

रत्नागिरी, पाली, कोल्हापूर, सांगोला, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा ते नागपूर असा हा मार्ग आहे. 1 हजार 87 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये किती गावे, शेतजमीन बाधित होणार आहे, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल. 80 टक्के भूसंपादन झाल्यानंतर आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशिवाय प्रकल्प सुरू करता येणार नसल्याने भूसंपादन वेगाने सुरू आहे. यात कोल्हापूर ते रत्नागिरी असा एक टप्पा आहे. आंबा घाट त्या टप्प्यात येतो. 

बंदरांचा फायदा विदर्भला 
नागपूर भारतातील महत्त्वाचे शहर असून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग या शहराजवळून जातात. कोकणाचा विदर्भाशी संपर्क नव्हता. कोकणात बंदरांचा विदर्भ, मराठवाड्याला फायदा होऊ शकतो. या मार्गामुळे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याचे काम सुरू झाले आहे.

Web Title: Four new tunnels to be built in Amba Ghat