गोवा बांबुळी रुग्णालयात पुन्हा एकदा निःशुल्क उपचार

अमोल टेंबकर
गुरुवार, 29 मार्च 2018

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य विमा योजनेची मदत घेण्यात येणार असून केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकाला त्याचा लाभ देण्यात येणार आहे.

सावंतवाडी - गोवा बांबुळी (गोमेकाॅ) रुग्णालयात पुन्हा एकदा निःशुल्क उपचार मिळणार आहेत. यासाठी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी अखेर हिरवा कंदील दिला. तसे लेखी पत्र त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱयांना दिले. मात्र त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य विमा योजनेची मदत घेण्यात येणार असून केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकाला त्याचा लाभ देण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात विस्कटलेली घडी पुन्हा बसविणार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी माहिती दिली.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची काल मुंबई येथे रात्री उशिरा चर्चा झाली होती. त्यात काही सकारात्मक निर्णय झाले होते. त्यानंतर आज पुन्हा श्री तेली यांनी आज गोव्यात जावून पुन्हा श्री राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार राजन म्हापसेकर, सुधीर दळवी बाळा नाईक, माजी सभापती अंकुश जाधव वैभव इनामदार चेतन चव्हाण शंकर देसाई सुरेश गवस दिव्या देसाई संगीता देसाई आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री राणे म्हणाले, 'आम्ही रूग्णाकडे पैसे मागितले नव्हते. तर दोन्ही राज्यातील लोकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेतला होता. मात्र आजपासून आम्ही पुन्हा सेवा देणार आहोत. तर चार दिवसानंतर कायम सातत्य राहण्यासाठी विमा योजनेची मदत घेण्यात येणार आहे.' असे लेखी पत्र राणे यांनी आपल्याला दिल्याचे श्री तेली यांनी सांगितले.

तेली पुढे म्हणाले, या सर्व प्रकाराला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. या निर्णयाला तीन महिने झाल्यानंतर सुध्दा चर्चा करण्यास त्यांनी तयारी दाखवली नाही. त्यामुळे पुढील सर्व तेढ निर्माण झाले. उद्यापासून पुन्हा निशुल्क उपचार सुरू होणार. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गोवा बांबुळी म्हापसा येथील अजीलो रूग्णालयात सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर लोकांना पुन्हा एकदा निःशुल्क पुरस्कार मिळण्यास मदत होणार आहे. काल घाई गडबडीत जाहीर करण्यात आलेल्या डीबीटी सेवेबाबत मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नाही. हा प्रकार म्हणजे केवळ धूळफेक आहे, असा ही आरोप तेली यांनी केला.

Web Title: Free medical treatment in goa babuli hospital in savantwadi