रत्नागिरीत सावरकरांच्या संगीत नाटकाला नव्वद वर्षे झाली पूर्ण

मकरंद पटवर्धन
Friday, 18 September 2020

राजकीय आंदोलनात भाग घ्यायचा नाही, जिल्ह्याबाहेर जायचे नाही, अशा अटी घालून ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत ठेवले होते.

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सिद्धहस्त, तेजस्वी लेखणीतून उतरलेले संगीत संन्यस्तखड्‌ग आणि अन्य नाटके त्यांनी रत्नागिरीच्या वास्तव्यातच लिहिली. राजकीय आंदोलनात भाग घ्यायचा नाही, जिल्ह्याबाहेर जायचे नाही, अशा अटी घालून ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत ठेवले होते; मात्र या काळात त्यांनी नाटक, कविता, सांस्कृतिक, धार्मिक चळवळीतून क्रांती उभी केली.

हेही वाचा - बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिकेचा खून करून मृतदेह खाडीत फेकला, कोकणात सात लाखांसाठी कुठे घडला प्रकार 

 

‘संन्यस्तखड्‌ग’ नाटकाला उद्या  (१९) ९० वर्षे होत आहेत. नाटकाच्या ७२ वर्षांनी पुनर्निर्मिती निमित्ताने डॉ. वंदना घांगुर्डे यानी या साऱ्याला उजाळा दिला. सुरवातीला सावरकर शिरगाव येथे व नंतर शेरेनाक्‍यावरील नारायण स्मृती या घरामध्ये वास्तव्यास होते. येथूनच वीर सावरकरांनी विठ्ठल मंदिर, पतितपावन मंदिरच्या माध्यमातून अस्पृश्‍यता निवारण, अस्पृश्‍यांचा देवालय प्रवेश, भाषा शुद्धी व लिपीशुद्धी आंदोलन, जात्युच्छेद पहिले सहभोजन, अखिल हिंदू गणेशोत्सव असे अनेक उपक्रम राबवले. त्या काळी संगीत नाटकेच लोकप्रिय असल्याने त्यांनी संगीत उत्तरक्रिया, सं. उःशाप, बोधिवृक्ष, सं. संन्यस्तखड्‌ग ही नाटके लिहिली.

‘संन्यस्तखड्‌ग’ नाटकाची ७२ वर्षांनी पुनर्निर्मिती नादब्रह्म संस्थेने २००२ मध्ये केली. यासाठी मंगेशकर कुटुंबीयांचा आशीर्वाद मिळाला. यात प्रमुख भूमिका प्रमोद पवार, दीनानाथ परंपरेतील गायक कलाकार डॉ. रवींद्र घांगुर्डे, चिन्मय पाटसकर व डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केली. आजवर याचे ६०हून अधिक प्रयोग केले. २०११ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘ब्रीद तुझे जगी दीनानाथ’ हे मास्टर दीनानाथांचे सांगीतिक चरित्र भारतरत्न लतादीदींच्या हस्ते प्रकाशित झाले आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत १२० नवे कोरोना रूग्ण ; मृतांचा आकडा दोनशेच्याजवळ

 

सावरकरांच्या भेटीतून चळवळीची दिशा

वीर सावरकर हे द्रष्टे देशभक्त असल्यानेच त्यांच्या भेटीकरिता अनेक क्रांतिकारक, मान्यवरांनी त्यांची शिरगाव व रत्नागिरीतील वास्तव्यात भेट घेतली. यामध्ये रा. स्व. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, नेपाळचे राजपुत्र हेमचंद्र समशेरजंग, क्रांतिकारक भाई परमानंद, सेनापती बापट, मेहेरअल्ली आदींचा समावेश होता.

सावरकरांची रत्नागिरीतील ग्रंथसंपदा

नेपाळी आंदोलन, मोपल्यांचे बंड, संगीत उ:शाप, लिपी शुद्धी, माझी जन्मठेप, हिंदूपदपादशाही, भाषा शुद्धी, संगीत संन्यस्तखड्‌ग, उत्तरक्रिया, किर्लोस्कर मासिकातील विज्ञाननिष्ठ निबंध.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: freedom movement contributing savarkar through musicals in ratnagiri