भविष्यात कोकणच विकासात अग्रेसर - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

वैभववाडी - कोकणात विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविल्या जात असून भविष्यात कोकणच विकासात अग्रेसर असेल, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केले.

वैभववाडी - कोकणात विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविल्या जात असून भविष्यात कोकणच विकासात अग्रेसर असेल, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केले.

शेर्पे ग्रामस्थांतर्फे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर आणि संचालक गणपत बेळणेकर यांचा सत्कार पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, जयेंद्र रावराणे, सजंय कापसे, विजय केनवडेकर, नगरसेवक संतोष माईणकर, दिलीप भावे उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘कोकण हा विविध नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला प्रांत आहे. या साधनसंपत्तीवर आधारित कोकणविकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्याचा मानस आहे. यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाचा समतोल साधून हा विकास केला जाणार आहे. दोन वर्षांपासून कोकणात वेगळ्या विकासाची चर्चा सुरू झाली आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहेत. मुंबई-गोवा चौपदरीकरण, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग, विजयदुर्ग बंदर असे अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. यामुळे आता कोकण विकासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळणार आहे. येत्या काळात अन्य प्रांतांच्या तुलनेत कोकण अधिक समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई राहणाऱ्या कोकणी माणसाला नेहमी आपलं कोकण विकसित व्हावे असे वाटते. यामुळे अनेक कार्यकर्ते कोकण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.’’

श्री. जठार म्हणाले, ‘‘कोकणचा विकास होत असताना स्थानिक लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथील लोकांची गरिबी दूर व्हावी याकरिता आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.’’ महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे शंतनू भडकमकर यांनी सत्कार केल्याबद्दल शेर्पेवासीय आणि बेळणेकर परिवाराचे ऋण व्यक्त केले.

Web Title: The future development of the leading kokan