‘गंमत-जंमत’मध्ये अंध मुलांना व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

गुहागर - आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या (ता. ७) प्रसारित होणाऱ्या गंमत-जंमत या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात गुहागरातील अंध विद्यार्थी मयुरेश गाडगीळचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे संचालन मीरा गाडगीळ यांनी केले आहे. अंध विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे कसे छंद जोपासतात, ते या कार्यक्रमात सांगण्यात आले.

४ जानेवारी जागतिक अंध दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आकाशवाणी मुंबईने गंमत-जंमत या कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले. कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि संचालन मीरा गाडगीळ (गुहागर) यांनी केले आहे. या कार्यक्रमात मंडणगड येथील स्नेहज्योती अंध विद्यालयात शिकणारा मयुरेश गाडगीळ, एल.बी.एस.एच. शाळा मनोर येथे शिकणारा देवेन सोनार आणि सी. बी. संखे इंग्लिश मीडियम बोईसर वेस्ट येथे शिकणारी अरिबा खान या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. मयुरेशने हार्मोनियमवर दोन भजने वाजवून दाखवली आहेत. देवेन सोनार हा आठवीतील विद्यार्थी कविता करतो, ब्रेल लिपीत लिहितोही. यापैकी काही कवितांचे सादरीकरण त्याने केले आहे. तसेच अरिबाने कार्टून नेटवर्कमधील निंजा हातोडी, सुझुका अशा अनेक कार्टूनचे हुबेहूब आवाज काढून दाखविले आहेत. या कलांच्या सादरीकरणाबरोबर सौ. गाडगीळ यांनी मुलांबरोबर गप्पा मारल्या. त्यातून सामान्य मुलांप्रमाणे आपण घरात कशी मदत करतो, आणखी कोणते छंद जोपासले आहेत, सहजपणे खेळतो हे देखील या अंध मुलांनी सांगितले आहे.  कार्यक्रमाचे प्रसारण शनिवारी सकाळी ९.३० वाजता अस्मिता वाहिनीवर होणार आहे.

Web Title: gamat-jamat blind child stage