गव्याने केला दुचाकीवर हल्ला अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

मालवण कुंभारमाठ-गवळीवाडा येथील लंगोटे दाम्पत्य आज सकाळी कामानिमित्त दुचाकीने (एमएच 07 जे 8601) कसालच्या दिशेने जात होते.

कट्टा ( सिंधुदुर्ग ) - गव्याने दुचाकीवर हल्ला केल्याने दाम्पत्य गंभीर जखमी झाले. मालवण-कसाल मार्गावर कुणकवळे बागवाडी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय सुधाकर लंगोटे (वय 28) आणि मेघा अक्षय लंगोटे अशी जखमींची नावे आहेत. 

मालवण कुंभारमाठ-गवळीवाडा येथील लंगोटे दाम्पत्य आज सकाळी कामानिमित्त दुचाकीने (एमएच 07 जे 8601) कसालच्या दिशेने जात होते. कुणकवळे बागवाडी येथे रस्त्यावर अचानक भलामोठा गवा समोर आला. अचानक भररस्त्यावर समोर आलेल्या गव्याला पाहून लंगोटे दाम्पत्याच्या पुढे असलेल्या दुचाकीस्वाराने कशीबशी धूम ठोकली. मात्र, मागाहून येणाऱ्या लंगोटे यांच्या दुचाकीवर काही समजण्याच्या आत क्षणातच गव्याने हल्ला केला. यात अक्षय आणि मेघा रस्त्यावर फेकले गेले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर काही वेळ तो गवा तेथे होता. हा सर्व थरारक प्रकार समोर काही अंतरावर थांबलेला दुचाकीवरील युवक पाहत होता. गवा तेथून निघून गेल्यावर लागलीच मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, पोलिस यांनी 108 रुग्णवाहिका बोलवून गंभीर जखमी झालेल्या त्या दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. 

बंदोबस्त करण्याची मागणी 

स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार चार ते पाच मोठ्या गव्यांचा वावर सद्यस्थितीत या परिसरात दिसून येत असल्याचे अनेकांनी सांगितले. आता तर हा दिवसाढवळ्या गव्याच्या हल्ल्याने अपघात झाल्याने कुणकवळे तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन खात्याने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन गव्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gava Attack On Two Wheelar In Kunkavale Sindhudurg Marathi News