दोडामार्ग तालुक्यातील आंबेली परिसरात गव्यांचा धुमाकूळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

दोडामार्ग - आंबेली परिसरात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. गव्यांचा कळप काजू बागायतीत घुसून काजू कलमे मोडून तोडून भुईसपाट करीत आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरदिवशी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. 

दोडामार्ग - आंबेली परिसरात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. गव्यांचा कळप काजू बागायतीत घुसून काजू कलमे मोडून तोडून भुईसपाट करीत आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरदिवशी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. 

आंबेली येथील हनुमंत (बबन) गवस यांच्या काजू बागेतील सुमारे 30 काजू कलमे गव्यांनी जमीनदोस्त केली. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. आंबेली परिसरात आठवडाभरापूर्वी 14 ते 15 गव्यांचा कळप दाखल झाला आहे. दिवसा जंगल भागात राहून सायंकाळ होताच काजू बागायतीत घुसून गवे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.

कधीकधी भरदिवसाही ते काजू बागायतीत दिसतात. त्यामुळे बागायतीत जाणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनले आहे. काजूचा हंगाम सुरु झाल्याने बागेची मशागत करणे गरजेचे आहे. बागेतील गवत काढणे, मोहर खुडणे, मोहर गळू नये म्हणून फवारणी करणे आणि अन्य काही कामे सुरू आहेत; मात्र दिवसा बागेत आढळून येणाऱ्या गव्यांमुळे शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरत आहे. 

आंबेली येथील हनुमंत गवस यांना गुरुवारी (ता.20) रात्री घरात असताना काजू बागेत गव्यांचा मोठ मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने ते बागेत गेले असता त्यांना सुमारे 14 ते15 गवे काजूची कलमे मोडताना त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांच्यासह अन्य कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यावर त्यांनी जंगल भागात धूम ठोकली. गवस जाऊन बघतात तर त्यांच्या बागेतील 24 ते 25 काजूची कलमे गव्यांनी जमीनदोस्त केली होती. अनेक कलमे मुळातून उपटून इतस्ततः फेकली होती. ऐन काजू हंगामात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत केलेली मेहनत, खर्च सगळं वाया गेले आहे. वनविभागाने पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 
शेतीसाठी नोकरी सोडली पण... 
हनुमंत गवस यांचे भाऊ रमेश गवस यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यामुळे पुण्यात नोकरीनिमित्त राहणारा त्यांचा मुलगा समीर नोकरी सोडून शेती बागायती सांभाळण्यासाठी आला; मात्र आल्याआल्या बागेची अपरिमित हानी पाहून त्याच्यासमोर अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. 

Web Title: Gava in Dodamarag Taluka