ड्रेनेजच्या टाकीत पडलेल्या गव्याची सुटका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 May 2019

एक नजर

सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीत आलेला गवा रेडा तेथील मोती महल या वसाहतीच्या सांडपाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने त्याला बाहेर काढले. यासाठी जेसीबीने टाकी फोडण्यात आली.

सावंतवाडी - शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीत आलेला गवा रेडा तेथील मोती महल या वसाहतीच्या सांडपाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने त्याला बाहेर काढले. यासाठी जेसीबीने टाकी फोडण्यात आली.

येथील नरेंद्र डोंगरावर वनविभागाच्या हद्दीत गवारेड्यांचा मुक्त वावर आहे. आठ दिवसापूर्वीच  शहरातील होळीचा खुंट परिसरात भर रस्त्यात गव्या रेड्यांचा कळप जाताना नागरिकांच्या दृष्टीस पडला होता. ही घटना ताजी असतानाच भरकटलेला गवारेडा नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नागरी वस्तीत घुसला. मात्र, मोतीमहल या वसाहतीच्या सांडपाण्याच्या टाकीत पडला.

टाकी अरुंद व खोल असल्याने त्याला वर येता येणे अशक्‍य झाल्याने तो टाकीतच अडकून पडला. हा प्रकार वसाहतीतील नागरिकांना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नजरेस आला.  नागरिकांनी याबाबतची कल्पना वनविभागाला तात्काळ दिली.

त्यानंतर काही वेळाने घटनास्थळी सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे,  वनपाल अमित कटके, प्रमोद राणे, विश्वनाथ माळी, प्रमोद जगताप व वनकर्मचारी दाखल झाले. त्यानी जेसीबीच्या साह्याने टाकीच्या बाजूने चर मारून रस्ता केला. त्यानंतर दोरीच्या साह्याने गव्याला बाहेर काढण्यात आले. या कार्यात गुंडू राठोड, वैभव कांबळे, युवराज चव्हाण तसेच वसाहतीतील नागरिकांनी सहकार्य केले. हा गवा मादी जातीचा होता साधारण नऊ वर्ष वयाचा या गवा रेड्याला बाहेर काढताच त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी सांगितले.

गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी मोती महल ही इमारत आहे. तेथे गवा अडकल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gava fall in Drainage tank Rescued