घोटगे-सोनवडे घाट काम लांबणार

घोटगे-सोनवडे घाट काम लांबणार

कणकवली - घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या अलाईनमेंटमध्ये बदल झाल्याने या घाटमार्गाचा काही भाग राधानगरी अभयारण्य संरक्षित क्षेत्राच्या २.७५ किलोमीटर क्षेत्रात येत आहे. परिणामी या घाटमार्गाच्या कामाला केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. तशी परवानगी मिळाल्यानंतरच घाटमार्गाच्या कामाच्या निविदा निघणार आहेत; मात्र पुढील कालावधीत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता घाटमार्गाचे काम वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे; मात्र विविध खात्यांच्या परवानगीचा ससेमिरा आणि राजकीय कुरघोडी यामुळे या घाटमार्गाचे काम दरवर्षी लांबणीवर पडत आहे. ३१ जानेवारीपर्यंत घाटमार्गाच्या कामाला प्रारंभ न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा घाटमार्ग संघर्ष समितीने दिला आहे.

घाटमार्गासाठी पर्यायी वनजमीन, केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी आदी अडथळे पार झाल्यानंतर गतवर्षी निविदा काढण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली; मात्र मंजूर प्लाननुसार रस्ता काढल्यास ४ किलोमीटरचा बोगदा किंवा खिंड तयार करावी लागणार होती. तांत्रिकदृष्ट्या ती बाब अशक्‍य होती. त्यामुळे घाटमार्गालगत असलेल्या खासगी जमिनीतून रस्ता तयार करण्याचा मुद्दा कणकवलीच्या कार्यकारी अभियंत्यांनी सुचवला होता; मात्र याच दरम्यान घाटमार्गाचे काम कणकवली विभागाकडून सावंतवाडी बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर घाटमार्गाचा नव्याने सर्व्हे करण्यात आला.  मे २०१८ मध्ये पर्यावरण विभागाच्या उच्चस्तरीय समितीने या घाट रस्त्याच्या नव्या मार्गाची पाहणी केली होती.

घाटमार्गाच्या फेरसर्व्हेनंतर नवीन रस्ताचा २.७५ किलोमीटरचा भाग राधानगरी अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्याची बाब निष्पन्न झाली. त्यामुळे या अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या, टप्प्याच्या मार्गासाठी केंद्रीय वन्यजीव व पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची अट घातली. त्यानुसार राज्याच्या वन्यजीव व पर्यावरण विभागाच्या समितीने घाटमार्गाच्या प्रस्तावाला मान्यता देऊन हा प्रस्ताव केंद्राच्या वन्यजीव आणि पर्यावरण विभागाकडे ८ जानेवारी रोजी पाठवला आहे.

केंद्रीय वन्यजीव आणि पर्यावरण विभागाकडून घाटमार्गाच्या बदललेल्या अलाईनमेंटला परवानगी मिळाल्यानंतरच घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या निविदा काढल्या जाणार आहे. केंद्रीय वन्यजीव विभागाकडून ना हरकत दाखल मिळणे आणि घाटामार्गची निविदा निघणे या कामांना किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आली. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. मेअखेरपर्यंत प्रत्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने घाटमार्गाचे काम वर्षभर लांबणीवर पडले आहे.

केंद्रीय पातळीवर घाटमार्गासाठी पाठपुरावा
घोटगे सोनवडे घाटमार्गाचे काम सुरू होण्यासाठी केंद्रीय वन्यजीव बोर्डाच्या परवानगीची आवश्‍यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य वन्यजीव बोर्डाने केंद्राकडे पाठवला आहे. तर केंद्राकडून लवकरात लवकर परवानगी मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. या घाटमार्गातील वन विभागाच्या २५. ७६ हेक्‍टर आर वनक्षेत्रातील ११ हजार १९२ झाडांच्या तोडीसाठी मुख्य वनसंरक्षक यांनी परवानगीही दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com