कोकणात आढळले ऍटलास, गोल्डन एम्परर मॉथ 

एकनाथ पवार
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही. 

वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही. 

जिल्ह्याला मोठा सह्याद्रीचा पट्टा लाभला आहे. यातील बहुतांशी भाग वैभववाडी तालुक्‍यात आहे. त्यातच सह्याद्री पट्ट्यालगत असणाऱ्या शिराळे, नावळे, करूळ, कुर्ली या गावांपासून अभयारण्याची सीमारेषा काही किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागात वन्यसंपदा मोठ्या प्रमाणात आढळून येते. बिबट्या, सांबर, गवा, डुक्कर, ससा, भेकर, खवलेमांजर, साळिंदर, घोरपड, कोल्हा, एवढेच नव्हे तर वाघाचाही वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. वन्यप्राण्यांसह येथील जंगलामध्ये वनौषधीही मोठ्या प्रमाणात आहेत. नरक्‍या, काळा कुडा यासह शेकडो वनौषधी या जंगलामध्ये आढळून येतात. याशिवाय विविध प्रकारची रंगीबेरंगी व डोळ्यांची पारणे फेडणारी फुलपाखरे आढळत असल्याने वनसंपदेच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. 

वैभववाडीतील खांबाळे येथील महेश चव्हाण यांच्या घरालगत आज सकाळी ऍटलास मॉथ हे पतंग आढळून आले. या फुलपाखराच्या पंखाचा विस्तार अन्य फुलपाखरांच्या तुलनेत मोठा आहे. हे पतंग 24 ते 25 सेंमी आहे. पंखाचे टोक सापाच्या तोंडाच्या आकाराचे आहे. पंखावर आकर्षक रंगसगंती आहे. त्यामुळे हे फुलपाखरू न्याहाळणाऱ्यांना एक वेगळीच अनुभूती येते. 

दरम्यान सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणव शिरवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यालय परिसरात गोल्डन एम्परर मॉथ जातीचे पतंग आढळून आले. याचा विस्तार 18 ते 20 सेंमी इतका आहे. पिवळ्या रंगाच्या पंखावर काळ्या, लाल रंगाने कोरीव काम करावे अशा स्वरूपाची रचना पंखाची आहे. दोन्ही पंखांच्या मधोमध डोळ्यांच्या आकाराच्या खुणा आहेत. हे दिसायला अतिशय सुंदर आणि देखणे आहे. 

वैभववाडी तालुक्‍यातील दऱ्याखोऱ्यांत अशा प्रकारची शेकडो फुलपाखरे आहेत. मात्र त्याचा अभ्यास आणि शोध घेणारी यंत्रणा येथे उपलब्ध नसल्याने ही सर्व वनसंपदा दुर्लक्षित आहे. येथील सह्याद्रीपट्ट्यात अशा पतंगाचा शोध घेतल्यास काही नवीन पतंग आढळण्याची शक्‍यता आहे. आंबोली परिसरात अशा प्रकारचे अनेक पतंग यापूर्वीच आढळून आलेले आहेत. 

या दोन्ही फुलपाखरांसोबतच अन्य काही फुलपाखरे येथे आढळून येतात. ऍटलास मॉथ हे फुलपाखरामधील सर्वात मोठे आहे. हे जगभरात आढळते. मात्र इतर पतंगाप्रमाणे या पतंगात फळ, फुलांमधील मध शोषून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे या पतंगाची वयोमर्यादा दहा ते पंधरा दिवसच असते. गोल्डन एम्परर मॉथ हा पतंगही जिल्ह्यात आढळतो. हा दिसायला अतिशय आकर्षक आहे. फुलपाखराचे सरासरी वय 6 ते 8 महिने असते. 
- हेमंत ओगले, आंबोली, मॉथचे (पतंग) अभ्यासक

Web Title: golden emperor moth, atlas moth found in Kokan, reports Eknath Pawar