मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल घेणार निरोप

मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल घेणार निरोप

कणकवली - कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत निरोप घेणार आहेत. त्याजागी नवीन सिमेंट क्रॉंक्रिटच्या पुलांची उभारणी होणार आहे. 1934 मध्ये महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर गेली 84 वर्षे या पुलांवरून कित्तेक टन अवजड वाहतूक सुरू होती.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मुलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटीश शासनाने 1930 मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर 1934 ते 1943 पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. तर बंदरातून होणारी वाहतूक बंद झाली. यात मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्व वाढले.

कणकवली शहराच्या वेशीवर गड आणि जानवली नदीवरील पुलांची कामे 1930 मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी 1 लाख 37 हजार 669 रूपये खर्च आला. तर गडनदी पुलाचे बांधकाम 1 लाख 26 हजार रूपयांमध्ये पूर्ण झाले. दोन्ही पुलांवरून 1934 मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्वाची बाब म्हणजे सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गड आणि जानवलीसह महार्मावरील इतर ब्रिटिशकालीन पूल मागील 84 वर्षात अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले आहेत.

ऑगस्ट 2016 मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्‍चित केले. त्यानुसार मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील अपुर्ण पुलांची कामे डिसेंबर अखेर पूर्ण केल्यानंतर गड, जानवली, कसाल येथील जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पुलांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली. ही कामे करणारी कंपनी दिवाळखोरीत गेल्याने आता या पुलांसाठी ऑक्‍टोबरमध्ये नव्याने निविदा होणार आहेत. ही पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात गड, जानवली, कसाल येथील जुने पूल पाडले जाणार आहेत.
- पी. पी. बनगोसावी,
अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल, बांधकाम
खारेपाटण पूल (1946-47), पियाळी पूल (1941) जानवली पूल (1934). गडनदी पूल लांबी (1934). कसाल पूल (1934), पिठढवळ पूल (1957), बांबर्डे पूल लांबी (1938).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com