esakal | आता कोकणातल्या पर्यटन उद्योगासाठी आहे नामी संधी
sakal

बोलून बातमी शोधा

government decision start this tourism industry in Konkan depends on the policies of the government

कोरोनातून सावरणाऱ्या कोकणासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

आता कोकणातल्या पर्यटन उद्योगासाठी आहे नामी संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे पर्यटन जिल्हे आहेत. कोकणच्या मातीतलं पर्यटन जर इथे वाढवायचं असेल तर आपल्याला इकोटुरिझम, कृषी पर्यटन यावर भर द्यावा लागेल. कोरोनातून सावरणाऱ्या कोकणासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पर्यटनाच्या संकटात आणि लॉकडाउनच्या या काळात मार्केटिंग, कौशल्य व्यवस्थापन, व्यावसायिक प्रशिक्षण यांवर भर द्यावा लागणार आहे. कोरोनोत्तर काळात पर्यटकांचा ओढा स्थानिक पर्यटनाकडे असू शकतो. त्यामुळेच कोरोनाच्या या संकटात कोकणातल्या पर्यटन उद्योगासाठी एक संधीही दडलेली आहे.  


राज्यभरातले पर्यटकही शहराच्या कोंडीतून बाहेर पडून कोकणातलं निसर्ग सौंदर्य अनुभवायला यायची वाट बघत आहेत; पण कोकणातला हा पर्यटन उद्योग नेमका कधी सुरू करायचा, हा निर्णय सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत पर्यटकांचा ओढा स्थानिक पर्यटनाकडे असू शकतो. त्याचवेळी लॉकडाउनमुळे निर्माण झालेली स्थिती यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगासमोर मोठी आव्हानेही आहेत. 

हेही वाचा- बापरे..! रत्नागिरीत या शहरात प्रत्येक भागात याचीच बाधा -


लॉकडाउनच्या काटेकोर नियमांमुळे पर्यटक सध्या प्रवासच करू शकत नाहीत. त्यातही काही काळाने पर्यटन उद्योगाला परवानगी मिळाली तरीही कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहेच. यासाठी पर्यटकांची आरोग्य चाचणी, सुरक्षित शारीरिक अंतर, मास्कचा वापर, वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवरची स्वच्छता याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. 


कोकणातला हा पर्यटन व्यवसाय टप्प्याटप्प्यानेच सुरू करावा लागेल. सध्या पर्यटन संकुलं आणि होम स्टेचा २/३ भाग सुरू करायला परवानगी आहे. ही परवानगी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या विलगीकरणीसाठी आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना थोड्याफार प्रमाणात अर्थार्जनाची संधी मिळाली; पण बहुतांश कोकणवासीयांनी हा धोका पत्करलेला नाही. जोपर्यंत लोकांकडे वाढीव पैसा येत नाही, तोपर्यंत पर्यटनालाही सुरवात होणार नाही. पर्यटकांना कोकणात यायचं असलं तरी वाहतुकीच्या व्यावहारिक अडचणीही सोडव्याव्या लागतील. ही वाहतुकीची संरचना अद्ययावत व्हावी लागेल. कोकणातले जलमार्ग कल्पकतेने आणि नव्याने सुरू केले तर कोकणात पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. 

हेही वाचा- चिपळुणात नियुक्ती काम मात्र मंत्रालयात काय आहे प्रकार ? -


कोरोनाच्या लॉकडाउनमध्येच कोकणावर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं संकट आलं. कोरोनामुळे बेकार झालेले पर्यटन व्यावसायिक संकटात सापडले. कोकणच्या पर्यटन व्यावसायिकांचीही नुकसानभरपाईची मागणी आहे. या मागणीचा सरकार कसा विचार करते, ते पाहावं लागेल. कोकणातल्या महाविद्यालयांमध्येही पर्यटनावर आधारित व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश करता येईल. कोरोनाच्या या स्थितीत कोकणवासीय आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. अशा तरुणांना कोकणातल्या पर्यटन उद्योगात सहभागी करून 
घ्यायला हवे.

हेही वाचा- मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण -

गावागावांनी जबाबदारी उचलावी
पर्यटन उद्योगावरचे कर, घरपट्टी, वीज बिल यामध्ये काही सवलत कोकणवासीयांना अपेक्षित आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या निसर्गसुंदर कोकणामध्ये एवढी शांतता यापूर्वी कधीच नव्हती. त्यामुळे इथले लोक आणि पर्यटक दोघेही संभ्रमात आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीतून आपण काही धडेही घ्यायला हवेत. लॉकडाउनच्या काळात पर्यटकांशिवाय कोकण कसं दिसू शकतं, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वाहनांचं प्रदूषण, गर्दी, कचरा या सगळ्यांतून कोकणच्या निसर्गाने काही काळ तरी हिरवा श्‍वास घेतला. हा निसर्ग जपायचा असेल तर इथलं पर्यावरण चांगलं ठेवणं, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोकणातल्या गावागावांनी ही जबाबदारी एकत्रितपणे उचलली पाहिजे.

- दत्तात्रय कुलकर्णी , निवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

संपादन - अर्चना बनगे