अंत्यविधीकडे ठेकेदाराची पाठ : दहा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत , शेवटी नातेवाईकांनीच नेले शवागरातून मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात सुमारे नऊ ते दहा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत 

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र, ज्याला याचा ठेका दिला त्यानेच आपल्याकडे माणसे नाहीत, असे सांगून सध्या अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. परिणामी, जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात सुमारे नऊ ते दहा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत होते. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन गावाकडे नेले आणि तेथे अंत्यसंस्कार केले. मात्र, यामुळे प्रशासनाची नामुष्की चव्हाट्यावर आली. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांना विचारले असता अंत्यविधी करण्याची जबाबदारी प्रशासनाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण यांच्यावर सोपविली असल्याचे स्पष्ट केले. 
 

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास गावोगावी विरोध वाढू लागला होता. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील शासकीय जमिनीत अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ११ सप्टेंबरला दिली होती. यांची जबाबदारी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणकडे देण्यात येत शासकीय खर्चात हे विधी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर प्राधिकरणने यासाठी निविदा काढली. ही निविदा एका ठेकेदाराने घेतली. एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी १५ हजार रुपये निधी निश्‍चित करण्यात आला.

हेही वाचा- होड्यांना उधाणाचा तडाखा, लाखाचे नुकसान -

ठेकेदाराने ठेका घेतल्यानंतर मात्र आपल्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य माणसे नसल्याचे सांगत अंत्यविधी नंतर करूया, असे सांगितले. त्यामुळे प्राधिकरण समिती अडचणीत आली आहे. कोरोना बळी ठरलेल्या रुग्णाचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काल (१७) सायंकाळपर्यंत अशाप्रकारे जिल्ह्यात ९ ते १० मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले होते. ही माहिती संबंधित नातेवाईकांना कळली. त्यामुळे आज सर्व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. आपआपल्या गावात नेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा- कोरोनाग्रस्तांचा उच्चांक, सिंधुदुर्गाची वाटचाल धोक्‍याकडे -

‘ती’ जबाबदारी प्राधिकरणची
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर यांना विचारले असता कोरोना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनाने प्राधिकरणवर दिली आहे. आम्ही फक्त मृताबाबत त्यांना माहिती देतो. त्यामुळे किती मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले? किती शिल्लक आहेत? याबाबत आपल्याला माहित नाही, असे सांगितले.

कोरोनाचे मृत्यू वाढल्याने प्रशासनाने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार शासकीय खर्चात सिंधुदुर्गनगरी येथे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया येथे सुरू आहे; मात्र ज्या व्यक्तींना आपल्या नातेवाईकांचा मृतदेह आपल्या गावात नेऊन अंत्यसंस्कार करावयाचे आहेत, त्यासाठी कोणतीही आडकाठी नाही. त्यासाठी परवानगी आहे.
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी 

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Uday Samant informed administration decided to cremate the bodies but nine to ten bodies are awaiting cremation at the district hospital