देवरहाटी नव्हे, दीडशे वर्षे जपली जैवविविधता

देवरहाटी नव्हे, दीडशे वर्षे जपली जैवविविधता

गुहागर - तालुक्‍यातील चिखली गावातील दीडशे वर्षांच्या जुन्या देवरहाटीचा सामाजिक वनीकरण विभागाने कायापालट केला आहे. पिढ्यान्‌पिढ्या जैवविविधतेने संपन्न असे हे दालन जपले जाण्यास गावकऱ्यांची श्रद्धा आणि काहीप्रमाणात अंधश्रद्धाही उपयुक्त ठरली आहे. आजही चिखलीप्रमाणे कोकणात खेड्यांमधून गावदेवीच्या मंदिराजवळ देवरहाट्या आहेत. वृक्ष, वेलींसह पशू, पक्षी, कीटक यांचा हा अधिवास आहे. तो जतन करण्याचा आदर्श चिखलीवासीयांनी ठेवला. 

चिखलीतील तळवली फाटा या बसथांब्याशेजारी स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे प्रवेशद्वार दिसते. हीच ती देवरहाटी. यामध्ये चौलमुग्रा, मैदालकडी, सुरंगी, उंडी, काजरा, नरक्‍या आदी ५० प्रकारचे जुने वृक्ष आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक जुन्या वेली इथे पाहायला मिळतात. वानर, भेकर, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, ससे, साळींदर असे प्राणी, फिशिंग ईगल, सर्पट ईगल, हॉर्नबील, गायबगळा, रातबगळा, हुडेड ओरिओल, घुबड, खंड्या, सुतार पक्षी, बुलबुल असे पक्षी, विविध प्रकारची फुलपाखरे, धामण, नाग, फुरसे, नानेटी, सरडा, सिंक, घोरपड असे सरपटणारे प्राणी आणि विविध प्रकारचे बेडूक इथे पाहायला मिळतात. 

या देवरहाटीचा सांभाळ गावातील अनेक पिढ्यांनी केला आहे. पूर्वी सायंकाळी ५ नंतर या देवरहाटीतून कोणी फिरकत नसे. गावाचा राखणदार देवरहाटीत राहतो. विषबाधा झालेल्यांना देवरहाटीत उतारा मिळतो. लघवी अगर शौचाला गेल्यास देव शिक्षा देतो. येथील झाडे तोडल्यास दीर्घ आजार होऊन मृत्यू येतो. अशा अनेक कथा सांगितल्या जात. त्यामुळेच देवरहाटीचे रक्षण झाले. आजही या देवरहाटीत कुऱ्हाड चालवली जात नाही. वादळासारख्या आपत्तीत मोडलेल्या फांद्या, सुकलेल्या फांद्या यांचा वापर फक्त शिमगोत्सवात होमात टाकण्यासाठी होतो, अशी माहिती भगवान कदम यांनी दिली. 

गावकऱ्यांनी श्रद्धेने जपलेल्या या देवरहाटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग करीत आहे.  ४ षट्‌कोनी निवारे (पॅगोडा), १५ ग्रॅनाईटची आसने, ६२० मीटर लांबीचा जांभ्या दगडांचा निरीक्षण पथ, विहीर, पाण्याच्या टाक्‍या, पशु-पक्ष्यांसाठी दोन कृत्रिम पाणवठे बांधण्यात आले आहेत. १०० प्रकारच्या औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. देवरहाटीच्या देखभालीसाठी भगवान कदम यांच्या अध्यक्षतेखाली १३ ग्रामस्थांची उद्यान समिती काम करीत आहे.

देवरहाटीच्या विकासासाठी दीड कोटीचा निधी मिळाला. उद्यानाबद्दल अधिक माहिती व संवर्धन अशी कामे सुरू आहेत. २०१९ ला हे समितीच्या ताब्यात देण्यात येईल. त्यामुळे नवीन पर्यटनस्थळ तयार होईल.
 - चंद्रकांत तावडे, सहायक लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण, गुहागर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com