esakal | गुलबर्गाच्या त्या कामगाराचा सिंधुदुर्गात खूनच
sakal

बोलून बातमी शोधा

०

कामगाराच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा नोंद केला आहे.

गुलबर्गाच्या त्या कामगाराचा सिंधुदुर्गात खूनच

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्‍यावरील "त्या' परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याचा प्रकार आज उघड झाला. त्याचा मृत्यू 24 ऑक्‍टोबरला झाला होता. क्षुल्लक कारणातून त्याला मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार मृताची पत्नी सुजाता लक्ष्मण पाडेवार (वय 30, रा. गुलबर्गा, कर्नाटक) हिने शनिवारी दिली. 

लक्ष्मण पाडेवार असे मृताचे नाव आहे. हाणामारीचा प्रकार 22 ऑक्‍टोबरला घडला होता. त्याचा उपचार सुरू असताना 24 ऑक्‍टोबरला मृत्यू झाला. पोलिसांनी परशुराम चलवादीसह सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोघे अल्पवयीन आहेत. 

याबाबत येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तक्रारदार सुजाता पाडेवार या पती लक्ष्मण व आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह येथील तपासणी नाक्‍याच्या परिसरात राहतात. तेथेच मोलमजुरीची कामे करतात. मृत पती लक्ष्मणच्या बहिणीचा नवरा परशुराम चलवादी हा तपासणी नाक्‍याच्या ठिकाणी असलेले लोखंड कित्येकवेळा चोरून परस्पर विकत असे. ही बाब लक्ष्मणला समजताच त्याने त्याला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. यावेळी परशुराम चलवादीचा नातेवाईक परशुराम काखंटकी याने माझ्या मामाला शिवीगाळ का करतोस, अशी विचारणा केली. त्यावेळी वाद झाला. 

यावेळी परशुराम चलवादी याची मुलगी लक्ष्मी, पत्नी यल्लम्मा, मुलगे उमेश व संतोष यांनी लक्ष्मणसोबत भांडण केले. भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. चारही जणांनी लक्ष्मणला पकडून धरल्यानंतर परशुराम चलवादीने हातातील कोयत्याची मूठ लक्ष्मणच्या डोक्‍यावर मारली. लक्ष्मण पळून जात असताना परशुराम काखंटकी याने त्याच्या डोक्‍यात दगड मारला. या घटनेत लक्ष्मण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. परिस्थिती पाहताच सुजाता पाडेवार बाळाला घेऊन पलीकडे असलेल्या खोलीत जाऊन लपून बसली. 

काही वेळानंतर लक्ष्मणचा मित्र धनू याने सुजाता पाडेवार हिला लक्ष्मण गंभीर जखमी असून, त्याला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याचे सांगितले. हा प्रकार ता. 22 ऑक्‍टोबरला रात्री घडला होता. उपचारादरम्यान लक्ष्मणचा 24 ऑक्‍टोबरला मृत्यू झाला. नातेवाइकांनी मूळ कर्नाटक येथील गावी अंत्यसंस्कार केल्यानंतर आज पत्नी सुजाता हिने येथील पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार परशुराम चलवादी, परशुराम काखंटकी, यल्लम्मा ऊर्फ लक्ष्मी परशुराम चलवादी, लक्ष्मी परशुराम काखंटकी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लक्ष्मणचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

दरम्यान, गोव्यात लक्ष्मणचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा नक्की मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्‍न येथील पोलिसांसमोर होता. पत्नी सुजाताने फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पोलिस निरीक्षक अनिल जाधव तपास करत आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक

loading image
go to top