घरात एकटी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीवर आत्याच्यार  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

तरुणावर खेड पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक केली आहे.

खेड : घरात एकट्या असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वाडीतच राहणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. खेड तालुक्‍यातील सोनगाव गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणावर खेड पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक केली आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मंगळवारी (ता. 15) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोनगाव गावात घडला. संशयित रोशन खेराडे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित आहे. मंगळवारी पीडित मुलगी ही घरात एकटी होती. घरातील लोक कामावर गेल्यानंतर व तिची आई दवाखान्यात बाहेर गेल्यानंतर ती शेजारील काकूंकडे गेली होती. त्या वेळी रोशन खेराडे हा त्या मुलीच्या घरात शिरून लपून बसला होता. ती अल्पवयीन मुलगी घरात आल्यानंतर घरातील दरवाजा आतमधून बंद करून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. जर कुणाला सांगितलेस तर मारून टाकेन, अशी धमकीदेखील दिली. संध्याकाळी त्या मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकिगत आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीचे पालक व तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर खेड पोलिसांनी रोशन खेराडे याला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार खेराडे याच्यावर बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्याच आठवड्यात खेडमधील खोपी गावात अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

हे पण वाचा  ... अन् ती डॉक्टर झालीच ; कहाणी एका जिद्दीची!

 

मुलींच्या पालकांना आवाहन 
घरात एकट्या असणाऱ्या मुलींना आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या देखरेखेखाली ठेवा, मुली आणि महिलांना कोण त्रास देत असेल, त्यांचा पाठलाग करत असेल अथवा कोणावर संशय असेल तर पोलिसांना कळवा अथवा नियंत्रण कक्षात फोनवरून माहिती द्या, मुलींच्या पालकांनी जागरूक राहा, असे आवाहन खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे. गुन्हेगारांना कडक शासन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

हे पण वाचामराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, ; खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 

संपादन - धनाजी सुर्वे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment to minor girl in ratnagiri