... अन् 'ती' डॉक्टर झालीच ; कहाणी एका जिद्दीची!

अशोक तोरस्कर 
Wednesday, 16 September 2020

शाळेत कधीतरी तिला शिक्षकांनी विचारले की, तू मोठी झाल्यावर कोण होणार? तिने मी डॉक्टर होणार असे आत्मविश्वासाने सांगितले

उतूर (कोल्हापूर)  - कोव्हीड योद्धा रुबिना नाईकवाडे उत्तूरच्या मुस्लिम समाजातील पहिली महिला डॉक्टर. शाळेत असतानाच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, कष्ट आणि अभ्यासाच्या जोरावरच अखेर हे स्वप्न पूर्ण झाले. उत्तूर येथील डॉ. रुबिना नाईकवाडे हिच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. 

गावातील मुस्लीम समाजातील ती पहिलीच महिला डॉक्टर. गुणवत्तेच्या जोरावर शासकीय कोट्यातून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून रुबिना एमबीबीएस झाली आहे. सध्या ती मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये कोव्हीड योद्धा म्हणून रुग्णसेवेत कार्यरत आहे. तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी नुकताच ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

उत्तूर येथील ऍड. शोकत नाईकवाडे यांची रुबिना ही मुलगी. शालेय शिक्षण गावातच झाले. शाळेत कधीतरी तिला शिक्षकांनी विचारले की, तू मोठी झाल्यावर कोण होणार? तिने मी डॉक्टर होणार असे आत्मविश्वासाने सांगितले. मात्र डॉक्टर होण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते याची बारावी होइपर्यंत तिला कल्पना नव्हती. मुळची हुशार आणि अंगभूत गुणवत्ता असली तरी मार्गदर्शनाचा अभाव होता. त्यामुळे पहिली सीईटी दिली आणि दोन चार गुणात तिचे एमबीबीएसचे ऍडमिशन हुकले. बीएएमएसला ऍडमिशन मिळाले. मात्र तिने ते नाकारले. एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी तिने पुढच्या वर्षी तयारी केली. कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून रुबिनाने सीईटी दिली आणि उत्तम गुणाने ती पास झाली. केवळ पासच नाही तर शासकीय कोट्यातून तिला मुंबईतील नामांकित सायन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. याआधी कधी मुंबईचे तोंडही पाहिले नसलेली रुबिना धाडसाने मुंबईत गेली. पहिल्या वर्षी हॉस्टेल मिळत नसल्याने राहायचे कुठे हा प्रश्न होता. तिच्याकडे डिपॉझिट ४० हजार मागितले गेले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. ऍडमिशन तर मिळाले पण राहण्याचा प्रश्न कसा सुटणार? या विचारातच तिने गाव गाठले. घरचे सर्वजण चिंताग्रस्त. मात्र याचवेळी माजी सैनिक कृष्णा झेंडे पाटील त्यांच्या मदतीला धावले. मुंबईत राहत असलेल्या आपल्या बहिणीला त्यांनी हकीकत सांगितली. केवळ राहण्याची सोय नसल्याने एका मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग पावते हे म्हटल्यावर त्यांच्या बहिणीने आपल्या घरी रुबिनाची राहण्याची व्यवस्था केली. काही दिवस तेथे राहिल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सहकार्याने रुबिनाला समाजकल्याण विभागाचे हॉस्टेल मिळाले. मात्र तरीही रुबिनाचे स्ट्रगल सुरूच होते. मात्र या सर्वाला तोंड देत केवळ गुणवत्तेच्या जोरावर ती अखेर एमबीबीएस झालीच. लगेचच डॉ. रुबिनाला सायन हॉस्पिटलमध्ये नोकरीही मिळाली. आता एमडी करून तिला स्त्री रोग तज्ञ व्हायचे आहे. गेले पाच महिने कोव्हीड योद्धा म्हणून रुग्ण सेवा बजावून रुबिना काही दिवसांसाठी गावी आली. तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तरुणांनी रुबिनाचा सत्कार केला. आपल्या माणसांनी केलेल्या या सत्काराने रुबिना आणि तिचे कुटुंबीय भारावून गेले. शालेय मुला मुलींना प्रेरणा मिळावी यासाठी रुबिनाला बोलते करून समोर आणलेला हा तिचा संघर्षपट. 

हे पण वाचा मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, ; खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 या कौटुंबिक सत्कार सोहळ्याला एस. डी. कोरवी सर, विजय गुरव, कृष्णा झेंडे पाटील, महादेव मिसाळ, अकबर नाईकवाडे, सौ. उषा चव्हाण, दत्ता चव्हाण, विद्यादर मिसाळ, इकबाल नाईकवाडे, राजू नाईकवाडे, उदय ओतारी, रजाक नाईकवाडे, आशिष नाईकवाडे आदी उपस्थित होते.

हे पण वाचाकोविड सेंटरमध्ये बारसे : अन् बाळ, बाळंतिणीला मिळाला आधार

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story to doctor girl in kolhapur uttur