हरिहरेश्‍वर गैरसोईंचे पर्यटनस्थळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लोणेरे - श्रीवर्धन तालुक्‍यातील "हरिहरेश्‍वर' या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांत सरकारने तब्बल 13 कोटी खर्च केले; मात्र अजूनही येथील अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

लोणेरे - श्रीवर्धन तालुक्‍यातील "हरिहरेश्‍वर' या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांत सरकारने तब्बल 13 कोटी खर्च केले; मात्र अजूनही येथील अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

हरिहरेश्‍वर हे ठिकाण "दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. इथले सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असूनही हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित राहिले आहे. पर्यटन विकासाअंतर्गत हरिहरेश्‍वर पर्यटन ठिकाणाचा विकास करण्यासाठी 2004-05मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यात नवाब लेक परिसर व परिसर, हरिहरेश्‍वर मंदिर परिसर, धर्मशाळा परिसर, अस्थिविसर्जन परिसर, स्मशानभूमी परिसर, इन्फ्रास्ट्रक्‍चर, भूमी सुधारणा आणि लॅंडस्केपिंग यांचा समावेश होता. त्याकरिता सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आजतागायत तब्बल 13 कोटींचा खर्च झाला; मात्र अजूनही कामे अपूर्णच आहेत. अस्थिविसर्जनासाठी ठिकठिकाणाहून नागरिक येतात. दगडावरून पाय घसरून अनेकदा छोट्या-मोठ्या दुखापती होतात. त्यामुळे समुद्रात जाण्यासाठी कॉंक्रिटचा स्लोप बसवण्याची मागणी होत आहे. 
हरिहरेश्‍वरमध्ये पर्यटन विकासअंतर्गत मंजूर कामांपैकी महिरप कमानीचे काम सोडले तर सर्व कामे अपूर्णावस्थेत आहेत. यात हरिहरेश्‍वर मंदिर परिसर, धर्मशाळा परिसर, अस्थिविसर्जन परिसर, स्मशानभूमी परिसर, पायाभूत सुविधांचा विकास, भूमी सुधारणा आणि लॅण्ड स्केपिंगअंतर्गत बगिचे ही कामे अपूर्णच आहेत. सुलभ शौचालय ग्रामपंचायतीकडे वर्ग केले नाही. पाणी नसल्याने तिथे दुर्गंधी व अस्वच्छता दिसते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे 
हरिहरेश्‍वर पर्यटन विकास आराखडा हा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते त्यात बदल करता येणार नसल्याचे सांगते. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी येथील पर्यटन विकासाकडे लक्ष देऊन उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

हरिहरेश्‍वर येथील रखडलेली कामे मार्चपर्यंत पूर्ण करायची आहेत. प्रदक्षिणा मार्गाच्या कामाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करू व जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून पूर्ण करू. 
- व्ही. आर. सातपुते, कार्यकारी अभियंता, महाड 

सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वच कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची केली आहेत. ग्रामस्थांना विचारात घेतले जात नाही. गैरसोईंमुळे अनेकदा पर्यटकांशी वाद होतो. 
- सचिन गुरव, उपसरपंच 

आम्ही दूरवरून हरिहरेश्‍वरला भेट देण्यास येतो; मात्र येथील अस्वच्छता व असुविधा पाहून नाराजी वाटते. बहुतांशी विकासकामे अपूर्ण दिसतात. 
- मनोहर सानप, पर्यटक 

Web Title: Harihareshwar non-tourist area