

Harnai Nirmalya Collection
esakal
दापोली : गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य समुद्रात जाण्यामुळे जलप्रदूषणासह समुद्री जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन हर्णै परिसरात प्रथमच राबविण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून सुमारे ८० टक्के निर्माल्य समुद्रात जाण्यापासून रोखण्यात यश आले. या संकल्पनेतून किनारपट्टीवरून किमान ६०० किलो निर्माल्य जमा झाले असून सदरचे निर्माल्य हे पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे फहद जमादार यांनी सांगितले.
ग्रामपंचायत हर्णै, सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हर्णै आणि जेएनके मरीन ॲक्वा लाईफ हर्णै यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पाळंदे बीच, हर्णै बंदराची संपूर्ण किनारपट्टी आणि हर्णै जेटी बंदर या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशभक्त व ग्रामस्थांनी निर्माल्य समुद्रात न सोडता संकलन केंद्रांवर जमा केले.
हर्णै परिसरातील समुद्र व जलपरिसंस्थेचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विशेषतः गणेशोत्सव काळात फुले, हार, दुर्वा तसेच अन्य पूजासाहित्य मोठ्या प्रमाणात समुद्रात विसर्जित केले जाते. त्यामुळे जलचरांच्या अधिवासावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करण्याचा उपक्रम पुढेही सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
उपक्रमाच्या आयोजनात जेएनके मरीन ॲक्वा लाईफचे संस्थापक फहद जमादार आणि सामाजिक कार्यकर्ते मुझम्मिल काझी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. ज्या ज्या ठिकाणी संकलनाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती ती योग्य पद्धतीने पार पाडण्यात आली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला. समुद्र स्वच्छ ठेवण्याबरोबरच जलचरांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य समुद्रात न टाकता त्याचे योग्य पद्धतीने संकलन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले. आपला समुद्र - आपली जबाबदारी, स्वच्छ हर्णै - सुंदर हर्णै’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.