वादळी स्थितीने हर्णै बंदर ठप्प; नौका किनाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी स्थितीने हर्णै बंदर ठप्प; नौका किनाऱ्यावर

वादळी स्थितीने हर्णै बंदर ठप्प; नौका किनाऱ्यावर

हर्णै : गेले पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस, वादळसदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्प झाली आहे. अजूनही दोन ते तीन दिवस वादळसदृश परिस्थितीचा धोका असल्याने मच्छीमार धास्तावले आहेत. त्यामुळे रोजची करोडो रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. अजून किती दिवस हे असंच वातावरण राहणार, अशी चिंता मच्छीमारांना लागली आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी नौका जयगड, आंजर्ले आणि दाभोळ खाडीत आसऱ्याला हलवल्या. रविवारी (ता. २१) सकाळी पुन्हा ढगाळ वातावरण आणि वारा सुटल्यामुळे शनिवारी (ता. २०) वातावरण शांत झाल्यावर मासेमारीला बाहेर पडलेल्या नौकामालकांची धावपळ उडाली. ओहोटीमुळे आंजर्ले खाडीत जात येत नव्हते. त्यामुळे ११ मासेमारी नौकांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आडोसा घेतला, तर किमान चार ते पाच नौकांनी फत्तेगड किल्ल्याचा आसरा घेतला. वातावरण थोडे शांत झाल्यावर आणि भरतीच्या वेळेस आंजर्ले खाडीत जाता येईल. तसेच येथील वादळ थांबल्याशिवाय पुन्हा मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाणार नाही, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. पर्यटकांना फिरवणाऱ्या छोट्या नौकांनीही फत्तेगड किल्ल्याचाच आडोसा घेतला आहे. जोरदार वाऱ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छीमारांची धावपळ उडाली आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

या बिघडलेल्या वातावरणामुळे अजूनही कोणी समुद्रमध्ये मासेमारी करत असेल तर त्याने जवळपास असलेल्या खाडीत जावे, असे नौकामालक आपापल्या नौकांवरील नौकाचालकांना सांगत होते. वादळामुळे ठप्प झालेल्या मासेमारीमुळे बंदरातील सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. नाश्ताचे हातगाडीवाले, बैलगाडी, रिक्षाटेम्पो, इतर तीनचाकी आणि चारचाकी वाहने, बर्फ कारखाने, सर्व प्रकारचे, दुकानदार हवालदिल झाले आहेत. या वातावरणामुळे हर्णै बंदरातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

५० टक्के नौका आंजर्ले खाडीत

सध्या फक्त हर्णै बंदरातील हजारो नौकांपैकी सहा आणि दोन सिलिंडर धरून ५० टक्के नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या आहेत. सुरुवातीपासूनच मासळीची अवाकच कमी झाली होती. सर्व खर्च अंगावरच पडत होता. त्यामुळे ५० टक्के नौका अजूनही आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत.

बंपर मासळी मिळू लागली होती पण...

मासेमारीच्या सुरुवातीस मासळी मिळण्याची परिस्थिती फारच गंभीर होती. गेल्या महिन्यात तर फिशमील माल बंपर होता. आता काही दिवसांपूर्वीच म्हाकुळ, पापलेट, सुरमई मासळी मोठ्या प्रमाणात, तर कोळंबी कमी प्रमाणात मिळायला सुरुवात झाली होती. पण येणाऱ्या मालाला व्यवस्थित दर मिळत नव्हता, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

loading image
go to top