'जिल्ह्यात आरोग्य केंद्रे डिजिटलचा प्रस्ताव '

'जिल्ह्यात आरोग्य केंद्रे डिजिटलचा प्रस्ताव '

दोडामार्ग - जिल्ह्यातील अडतीस आरोग्य केंद्रे मुंबईतील टाटा, जेजे व केईएमच्या मेडिकल कॉलेजशी डिजिटली जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 लाखांचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. जेजे, केईएम, टाटा अशा मोठ्या मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपयोग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेली मेडिसिनच्या माध्यमातून आरोग्य केंद्रातील रुग्णांना केला जाणार आहे. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून त्याची सुरवात जिल्ह्यात करायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्याकडे तशी मागणी केल्याचे जठार म्हणाले. 

केंद्र व राज्य शासनाकडून गावोगावच्या ग्रामपंचायतींना दिला जाणारा निधी पोचतो की नाही ते पाहण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करतील. प्रत्येक गावात निधी पोचला तर विकास होईल आणि विकास झाला तरच संघटना वाढेल. ते लक्षात घेऊन प्रत्येक गावच्या विकासाच्या बॅकलॉगसंदर्भात गावभेट कार्यक्रमातून चर्चा केली जात आहे, अशी माहितीही जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येथील स्नेह रेसिडन्सीमध्ये पत्रकार परिषद झाली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा सचिव सुधीर दळवी, तालुकाध्यक्ष संदीप नाईक, जयदेव कदम व पंचायत समिती सदस्य बाळा नाईक उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""तालुक्‍यात रविवारपासून (ता. 19) गावभेट कार्यक्रमाला सुरवात झाली. दोन दिवसांत 25 गावांना भेटी दिल्या. तिथले कार्यकर्ते, गावकरी यांच्या भेटीतून अनेक प्रश्‍न समजून घेतले. विकासाचा बॅकलॉग माहिती करून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील "पार्लमेंट टू पंचायत' ही संकल्पना प्रत्यक्षात यायला हवी. पार्लमेंटमधून पाठविलेला निधी ग्रामपंचायतीत पोचतो की नाही, विकासाचा अनुशेष भरून निघतो की नाही हे पाहणे आवश्‍यक आहे.'' 

ते म्हणाले, ""म्हापसेकर, आठलेकर, दळवी आणि तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्‍याचा गावभेट कार्यक्रम यशस्वी होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. नियोजन गावागावात होत आहे.'' 

ते म्हणाले, ""एमआयडीसी प्रकल्पामुळे आडाळी "ब्युटी स्पॉट' बनले आहे. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी चर्चा करून आडाळीत रोजगारनिर्मिती करणारे उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन गोव्यातील कारखाने आडाळीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.'' 

ते म्हणाले, ""नाबार्डच्या माध्यमातून तालुक्‍याला पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील साकवापेक्षा मोठे असलेले, छोटे-छोटे पूल बांधण्याचे नियोजन आहे. आयी, हेवाळे, पणतुर्लीमधील पूल प्राधान्याने उभारण्याचा प्रयत्न त्या निधीतून होईल.'' 

ते म्हणाले, ""गावकऱ्यांची तयारी असेल तर हत्ती अभयारण्य आणि त्यातून रोजगारनिर्मिती व पर्यटन उद्योग उभारण्याचा मानस आहे.'' 

मुनगंटीवार, केसरकरांचे आभार 
यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिलारी धरणाच्या उर्वरित कामासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तालुक्‍यातील काजू लागवड व प्रक्रिया उद्योगासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुकावासीयांच्या विकासासाठी ते चांगले पाऊल आहे. त्यामुळे आपण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानतो, असे जठार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com