कोरोना माहिती मिळत नसल्याचा मालवण पालिका सभेत आरोप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

शहरात सकाळी रुग्ण आढळला तरी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पालिकेला त्याची माहिती दिली जात नाही.

मालवण : शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागामार्फत पालिकेला कोणतीही कल्पना न देता त्या रुग्णाला परस्पर होम आयसोलेशनसाठी पाठवले जाते. शहरात सकाळी रुग्ण आढळला तरी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पालिकेला त्याची माहिती दिली जात नाही. याबाबत पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी पालिका सभेत नाराजी व्यक्त केली. होम आयसोलेशनला पाठवताना संबंधित रुग्णाकडे स्वतंत्र शौचालय आणि बाथरूम व्यवस्था आहे का? याची खात्री करून घेणे आवश्‍यक असून यापुढे पालिकेची परवानगी घेऊनच शहरात रुग्णांना होम आयसोलेशनला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - डोंगराच्या एका उंच खडकावर बसतोय बिबट्या, गावात होऊ लागली चर्चा 

येथील पालिकेच्या काल झालेल्या सभेत शहरातील बाधित रुग्णांबाबत चर्चा झाली. बाधित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून वेळेवर पालिकेला दिली जात नाही. अनेकदा नगरसेवकांना स्वतःच्या प्रभागात मिळालेल्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावरील बातम्यांनंतर समजते. आरोग्य विभागाकडून सायंकाळी ४ वाजता शहरातील रुग्णांची माहिती पालिकेला दिली जाते. तोपर्यंत या रुग्णाच्या संपर्कातील त्याचे नातेवाईक बाजारात सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे या रुग्णांची माहिती तातडीने पालिका तसेच संबंधित नगरसेवकांना दिल्यास बाजारात असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना त्वरित घरात आणणे शक्‍य होणार असल्याचे गणेश कुशे म्हणाले.

अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन देताना त्यांच्याकडे स्वतंत्र शौचालय आणि बाथरूम आहे का, याची खबरदारी घेतली जात नसून त्यामुळे अन्य नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे यतीन खोत म्हणाले. यावर उपाय म्हणून कोरोना रुग्ण मिळाल्यास पालिकेला त्याची माहिती द्यावी, त्यानंतर पालिकेचे कर्मचारी त्या घरी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र देतील, त्यानंतरच संबंधित रुग्णाला होम आयसोलेशन करावे, अशी मागणी यतीन खोत यांनी केली.

हेही वाचा - गणपतीपुळेतील स्थिती ; किनाऱ्यावरूनच श्रींच्या कळस दर्शनावरच भक्‍तांचे समाधान

कंटेन्मेंट झोनमध्ये नियम धाब्यावर 

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांनी कंटेन्मेंट झोनमधील नागरिक बाजारात फिरत असल्याबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. शहरात काहींना घरात रुग्ण आढळल्यानंतर १४ दिवस बाहेर जाण्यास मनाई केली. तर काहींना तीन दिवसांतच बाहेर येण्यास परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 
 

तीन दिवस तरी क्वारंटाईन

मुख्याधिकारी जावडेकर म्हणाले, ‘‘कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना रॅपिड टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह आल्यास अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर फिरण्यास परवानगी आहे; मात्र संबंधितांना किमान ३ दिवस तरी घरातच ठेवावे, शहरात अशी २४ घरे कंटेन्मेंट झोन असून त्यांच्यासाठी संपूर्ण शहराला अडचणीत आणू नका, त्या घरांतील लोकांच्या अत्यावश्‍यक गरजा भागविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा, असे आप्पा लुडबे म्हणाले.’’

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health department of sindhudurg do not inform to municipal corporation relate information of covid patients