esakal | गणपतीपुळेतील स्थिती ; किनाऱ्यावरूनच श्रींच्या कळस दर्शनावरच भक्‍तांचे समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

situation in Ganpatipule covid impact for  Financial turnover stopped

कोरोनामुळे मंदिरे बंदच, आर्थिक उलाढालही थांबली

गणपतीपुळेतील स्थिती ; किनाऱ्यावरूनच श्रींच्या कळस दर्शनावरच भक्‍तांचे समाधान

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोविडमुळे केलेली टाळेबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यांतर्गत सीमा वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनस्थळांकडे येऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय गणपतीपुळेत येत आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केले नसले तरीही देवाच्या दर्शनाची आस लागलेले अनेकजण मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन श्रींच्या दर्शनाचे समाधान घेऊन गावी परतत आहेत.


कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली होती. अंतर्गत वाहतुकीसह जिल्ह्याच्या सीमा मार्चपासून बंद केल्या होत्या. रेल्वे, एसटी सेवेसह खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. गर्दी होऊ नये यासाठी मंदिरे, पर्यटनस्थळे बंद ठेवली गेली. त्यामुळे पर्यटन व्यावसायच ठप्प झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, पावस, मार्लेश्‍वर, परशुराम येथील ठिकाणांवर शुकशुकाट होता. सर्वाधिक गर्दी गणपतीपुळे येथे होते. 

हेही वाचा- पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना थाटामाटात निरोप -


यंदा संकष्टी, अंगारकीसह गणेशोत्सवातही गणेशभक्‍तांना दर्शन होऊ शकलेले नाही. सप्टेंबर महिन्यात शासनाने दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी टाळेबंदीत बहुतांश शिथिलता दिली आहे; मात्र मंदिरे, शाळा यांसह काही घटक अद्यापही बंदच ठेवलेले आहेत. व्हॉटस्‌ ॲप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाद्वारे विविध मंदिर व्यवस्थापनांकडून आरती, नियमित होणारी पूजा प्रसिद्ध केली जात आहे; परंतु प्रत्यक्ष मंदिराच्या ठिकाणी जाऊन देवांचे दर्शन घेण्याची आस भक्‍तांना लागलेली आहे.

हेही वाचा- कोकणाच्या विकासासाठी फिश लॅडींग सेंटर्स गरजेचे : खा. सुनील तटकरे यांची अधिवेशनात मागणी -

पश्‍चिम महाराष्ट्रातील हजारो भक्‍तगण गणपतीपुळेत देवदर्शनासाठी येतात. सप्टेंबरपासून जिल्हा बंदी उठली आणि अनेकांची पावले आपसूकच मंदिरांकडे वळू लागली आहेत. त्याप्रमाणे शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी सुमारे ६० ते ७० पर्यटकांच्या गाड्या गणपतीपुळ्यात येऊन जात आहेत. नियमित दोन ते चार गाड्यांमधून भक्‍तगण येऊन जातात. मंदिर बंदच असल्यामुळे श्रींच्या दर्शनाची इच्छा अपुरी राहत असली तरीही गणपतीपुळे मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन ते समाधानी होत आहेत. काही पर्यटक अथांग आणि शांत समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेऊन माघारी परतात. कोरोनामुळे हॉटेल, लॉजिंगही बंदच आहेत. मंदिर सुरू केल्यानंतरच येथील व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही आवश्‍यक त्या सोयी-सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत. पुढील महिनाभरात मंदिरे सुरू करण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनांकडूनही आचारसंहिता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

कोरोनामुळे गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी अजूनही बंदच आहे. जिल्हाबंदी उठल्यानंतर काही पर्यटक गणपतीपुळेत येत आहेत. पर्यटक किनाऱ्यावरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात आणि माघारी जात आहेत.
- डॉ. विवेक भिडे, गणपतीपुळे

संपादन - अर्चना बनगे