आमदार नीतेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

कणकवली - राष्ट्रीय महामार्ग उप कार्यकारी अभियंत्यांवर चिखलफेक प्रकरणी आमदार नीतेश राणेंसह 19 जणांना आज कणकवली न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता.10) सुनावणी होणार आहे.

कणकवली - राष्ट्रीय महामार्ग उप कार्यकारी अभियंत्यांवर चिखलफेक प्रकरणी आमदार नीतेश राणेंसह 19 जणांना आज कणकवली न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता.10) सुनावणी होणार आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नीतेश राणेंसह पाच जणांची प्रकृती बिघडली आहे. यातील श्री. राणे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चार जणांबाबतचा निर्णय कारागृह निरीक्षक घेणार आहेत. दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी 11 संशयितांची नावे पोलिसांनी निश्‍चित केली असून त्यांची धरपकड होण्याची शक्‍यता आहे.

कणकवली गडनदी पुलावर 4 जुलैला स्वाभिमान कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उप कार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल ओतला होता. या प्रकरणी शेडेकर यांनी नीतेश राणे यांच्यासह 50 जणांविरोधात कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी 19 जणांना त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. या सर्वांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कणकवली न्यायालयात आज दुपारी तीन वाजता हजर करण्यात आले.

सरकारी पक्षाची बाजू मांडताना अॅड  गजानन तोडकरी यांनी अन्य आंदोलक आरोपींना ताब्यात घ्यावयाचे असल्याने वाढीव पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली. तर अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. उमेश सावंत यांनी याला हरकत घेतली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी मोबाईल, चिखल फेकलेल्या बदल्या, वाहने आदी जप्त केली आहेत. त्यामुळे वाढीव कोठडी मिळू नये असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सलीम जमादार यांनी नीतेश राणेंसह सर्व आरोपींना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयीतांमध्ये नीतेश नारायण राणे (38), समीर अनंत नलावडे (47), संजय मधुकर कामतेकर (46), राकेश बळीराम राणे (35) , अभिजित भास्कर मुसळे (42), निखिल प्रकाश आचरेकर (36), राजन श्रीधर परब (54), संदीप रमाकांत सावंत (35,रा.वागदे), लक्ष्मण संभाजी घाडीगावकर (42,वागदे), संदीप चंद्रकांत मेस्त्री (36, कलमठ), रवींद्र बाळकृष्ण गायकवाड (45), सदानंद गोविंद हळदीवे (64,फोंडाघाट), किशोर जगन्नाथ राणे (52), शिवसुंदर शाहू देसाई (24), सचिन गुणाजी पारधिये (36,कळसुली), विठ्ठल दत्ताराम देसाई (55), मिलींद चंद्रकांत मेस्त्री (35,कलमठ), संदीप बाळकृष्ण नलावडे (40), मेघा अजय गांगण (42) यांचा समावेश आहे.

या सुनावणी दरम्यान राणे यांच्यासह विठ्ठल देसाई, संजय कामतेकर, मेघा गांगण, राकेश राणे यांची प्रकृती खालावल्याने, त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने या पाच जणांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. 

राणे यांच्यासह 19 जणांना सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली. तर वैद्यकीय उपचारासाठी नीतेश राणे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तर अन्य चौघांबाबतचा निर्णय सावंतवाडी कारागृह निरीक्षक घेणार आहेत.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची न्यायालया आवारात गर्दी
आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 आंदोलनकर्त्यांबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे स्वाभिमान कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांनी न्यायालय आवारात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, अशोक सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी न्यायालय आवार भरून गेले होते.

आमदार राणेंना जिल्हा रूग्णालयात हलवले
सावंतवाडी - चिखल फेक प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आमदार नितेश राणे यांना आज सायंकाळी वैद्यकिय तपासणीसाठी येथील येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले; मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आमदार राणे यांना सावंतवाडी कारागृहात आणण्यात येत असल्याचे समजल्यावर जिल्हाभरातुन स्वाभिमानचे कार्यकर्ते येथे दाखल झाले. मोठा पोलिस फौजफाटा आधीपासूनच कारागृह तसेच रुग्णालय परिसरात तैनात ठेवण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing on bail application of MLA Nitesh Rane tomorrow