सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने वेंगुर्लेत मोठी पडझड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. तालुक्‍यातील नदी, खाडी, ओहोळ यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती.

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात काल (ता. 3) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात आज सायंकाळपर्यंत सुमारे 4 लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद झाली. तालुक्‍यात गेल्या 24 तासात 128.4 मिलीमीटर, तर आतापर्यंत एकूण 2822.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

काल (ता. 3) दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. आज सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरूच होता. सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. तालुक्‍यातील नदी, खाडी, ओहोळ यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. तालुक्‍यातील आरवली येथील सुरेश गोडकर यांच्या घरावर झाड पडून 4 हजार 800 रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पेंडुर येथील सत्यवती सावंत, तिलोत्तमा सावंत, दिगंबर सावंत, भाग्यश्री सावंत, भिकाजी गावडे, शंकर गावडे, अर्जुन सावंत, इंदिरा नेमण, राधाबाई सावंत, मंगेश नेमण, नारायण सावंत, सीताराम गावडे यांच्या घरावर आंब्याचे, फणसाचे झाड पडून नुकसान झाले. यातील काहींच्या संडासावरील पत्रे, छप्पर उडून गेले. काहींच्या घरात पाणी भरून अन्नधान्याचेही नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावेळी घटनास्थळी सरपंच गितांजली कांबळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, निलेश वैद्य, ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक, तलाठी गवस, ग्रामसेवक, गणेश बागायतकर, कोतवाल शेटकर, ग्रामस्थ उमेश सावंत, प्रभाकर नाईक, देवा कांबळी, नाना गावडे, संतोष नाईक, काका नाईक, सुनिल सावंत, पपू गावडे, महेश सावंत, उत्तम सावंत आदी उपस्थित होते. 
तालुक्‍यातील रमा गोपाळ कन्याशाळा एकात्मिक बालविकास प्रकल्प स्वच्छतागृहावर फणसाची फांदी पडून नुकसान झाले आहे. मठ बोवलेकरवाडी येथे पहाटे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Damage In Vengurle Due To Stormy Rains