esakal | सिंधुदुर्गात पावसाची संततधार ओसरेना; समुद्रही खवळला
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात पावसाची संततधार ओसरेना; समुद्रही खवळला

सिंधुदुर्गात पावसाची संततधार ओसरेना; समुद्रही खवळला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वैभववाडी : जिल्ह्यात संततधार सुरूच आहे. जिल्हयातील काही प्रमुख मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यांना पावसाने अक्षरक्षः झोडपुन काढले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असुन शेती, बागायतीत पुराचे पाणी घुसुन शेतीचे नुकसान होत आहे. समुद्र खवळला असुन धोक्याचा तीन नंबरचा बावटा फडकविण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास पुरस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आज सकाळपासुन जिल्हयाच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, तिलारी धरण परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. मालवण तालुक्यातील बांदीवडे गावात जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. मसुरे परिसरात देखील गंभीर पुरस्थिती आहे. येथील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नदी दुथडी भरून वाहत असुन पुराचे पाणी शेती, बागायतीमध्ये शिरले आहे. कित्येक एकर भात शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा: 'राणे मंत्री झाले म्हणून शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही'

समुद्राला उधाण आले असुन धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. वेंगुर्ले तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपुन काढले. वेंगुर्ले-सावंतवाडी या मुख्यमार्गावरील तळवडे-होडावडे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. याच नदीचे पाणी तुळस, केळुस पंचक्रोशीतील भातशेतीत शिरले आहे. त्यामुळे या भागातील भातशेती देखील पाण्याखाली आहे. तिलारी प्रकल्पक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तिलारी प्रकल्पाच्या खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे २० ऑगस्टपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तिलारी नदीलगतच्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तिलारी नदीची पाणीपातळी सध्या ४०.४०० मीटरपर्यत पोहोचली आहे. या नदीची धोका पातळी ४३.६०० मीटर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही कारणांसाठी नदीपात्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी तेरेखोल नदीला आलेला पुर आज काही अंशी ओसरला आहे. त्यामुळे बांदा शहरातील काही भागात साचलेले पुराचे पाणी देखील पहाटे ओसरले. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून पाणी जात असल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता; परंतु आज पहाटे सहा वाजता या पुलावरील पाणी पुर्णतः ओसरल्यामुळे वाहतुक पुर्ववत झाली आहे.

हेही वाचा: Good News - आता दाखल्याशिवाय मिळणार शाळेत प्रवेश

खारेपाटण शहराला पुन्हा धोका

वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळपासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खारेपाटण शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री उशिरा पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे या परिसरातील भातशेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास खारेपाटण परिसरात परिसरात पुर येण्याची शक्यता आहे.

  • मसुरे परिसरात पुरस्थिती गंभीर

  • समुद्राला उधाण, तीन नंबरचा बावटा

  • मालवण, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक मार्गावर पुराचे पाणी

  • कित्येक एकर भातशेती पाण्याखाली, बागायतीत पुराचे पाणी

  • तिलारी दगडी धरणाचे चार दरवाजे उघडले असुन नदीलपात्रालगतच्या दहा गावांना सतर्कतेचा इशारा

  • आंबेरी, बांद्यातील पुर काही अंशी ओसरला

loading image