esakal | 'राणे मंत्री झाले म्हणून शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'राणे मंत्री झाले म्हणून शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही'

'राणे मंत्री झाले म्हणून शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मालवण : ग्रामीण शिक्षण पद्धती आहे त्यातील चांगल्या गोष्टी करण्यास सुरवात केली आहे. कोकणात सेंटर ऑफ एक्सलेंस (उत्कृष्टतेचे केंद्र) असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून एमएसबीटीच्या फंडातून सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून मालवणातील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात येत्या दोन महिन्यात एक्सलेंस केंद्र उभारण्यात येणार आहे. यात सहा कोटीची इमारत आणि २४ कोटींचा अत्याधुनिक अभ्यासक्रम असेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

सामंत म्हणाले, 'शिवसंपर्क अभियान हे दरवर्षी राबविले जाते. संघटनात्मक आणि सामाजिक काम करण्यासाठी या अभियानाचा उपयोग केला जातो. शिवसैनिक हा कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविले जात नाही. संघटना वाढविण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. एखाद्या स्थानिक पातळीवरच्या कार्यक्रमात शिवसेना-भाजप युती होईल का? असा प्रश्‍न करत युती ही कार्यक्रमावर ठरत नाही तर युतीची बोलणी, निर्णय जो आहे तो पक्षप्रमुख, मुख्यमंत्री घेतात. त्यामुळे वेंगुर्लेतील एका कार्यक्रमामुळे युती होईल असे कोणाला वाटत असेल तर त्या वादात मी पडणार नाही.' नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले तरी त्याचा शिवसेना संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र कोकणातील व्यक्ती मंत्री झाली आणि त्यांच्या माध्यमातून कोकणचा शाश्‍वत विकास होत असेल, प्रदूषण विरहित विकास होणार असेल तर त्या प्रकल्पाबाबत शिवसेना नागरिकांच्या बाजूने राहील. राणेंच्या मंत्रीपदाचा फायदा कोकणच्या विकासाला व्हावा अशी आमचीही इच्छा आहे.

हेही वाचा: नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य

प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्या अनुषंगाने सहाशे ते सातशे प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने भरता येतील का? याचा विचार सुरू आहे. त्यानुसार यातील काही प्राध्यापक मालवणात दिले जातील. ऑनलाईन शिक्षणाची समस्या आहे. त्याबाबत राज्याचा अपग्रेडेशनचा डीपीआर बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी जे पैसे लागतील ते उपलब्ध करून देऊ असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी सुरु केलेल्या चांदा ते बांदा या योजनेचे प्रतिबिंब हे रत्नसिंधू या योजनेत दिसावे यासाठी मी स्वतः खासदार विनायक राऊत, आमदार नाईक यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आवश्यक मान्यता देतील, असेही सामंत म्हणाले.

यावेळी आमदार नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी समन्वयक पूनम चव्हाण, नगरसेविका सेजल परब, मंदार केणी, नितीन वाळके, भाई कासवकर, बाबा सावंत, किरण वाळके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तौक्ते भरपाईवरून मुख्यमंत्र्यांचे चोख प्रत्युत्तर

तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात मुख्यमंत्र्यांनी दौरा करत नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍यावरून विरोधकांनी टीका टिपणी केली. या टीकेला उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलत जिल्ह्याची जी 45. 49 कोटी रुपयांची मागणी होती. ते सर्व पैसे उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यात तालुक्यात 2 कोटी 65 लाख रुपये मच्छीमारांसाठी, 6 कोटी 23 लाख रुपये हे घरांसाठी 2 कोटी 73 लाख रुपये हे शेतीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली ही नुकसान भरपाई मिळाली असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: चिपळूणातील रुग्णालात 2 महिने ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा पडून

चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

चिपी विमानतळाचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. डीजीसीएकडे अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट कंपनीने पाठविला आहे. डीजीसीएची परवानगी मिळाल्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसात हे काम होऊ शकते. विमानतळ सुरू होणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. वैभव नाईक, मी, दीपक केसरकर पाठपुरावा करत आहेत त्याला निश्‍चितच यश मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

loading image