esakal | चिंता वाढली! धोकादायक पणदेरी धरण पावसामुळे पुन्हा ओव्हरफ्लो
sakal

बोलून बातमी शोधा

चिंता वाढली! धोकादायक पणदेरी धरण पावसामुळे पुन्हा ओव्हरफ्लो

चिंता वाढली! धोकादायक पणदेरी धरण पावसामुळे पुन्हा ओव्हरफ्लो

sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : पणदेरी धरण (panderi dam) परिसरासह तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. सुरक्षेच्या दृष्टीने ३ मीटरने कमी करून पाणी पातळी ११५.५० मीटरवर आणण्यात आलेले धरण पुन्हा ओव्हरफ्लो झाले. मंगळवारी पाणी पातळी ११७.७० वर पोहचल्याने चिंता वाढली. (mandangad) यासाठी सांडवा व कालव्यातून विसर्ग प्रचंड वेगाने सुरू केला असून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा घटनास्थळी ठाण मांडून असलेल्या लघुपाटबंधारे उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिला.

५ जुलै रोजी पणदेरी धरणाला गळती लागल्याने ६ जुलैपासून धरणाचा पाणीसाठा कमी करण्यात आला होता. त्यासाठी विसर्ग सांडव्याची भिंत ३ मीटरने कमी करण्यात आली. तसेच कालव्यातून पाणी सोडून गळती थांबविण्यात प्रशासनाला यश आले होते; मात्र हवामान खात्याने तीन दिवसांत वर्तविलेला अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरला. तालुक्यात दोन दिवस मुसळधार वृष्टी (heavy rain) झाली. पणदेरी धरण परिसरातही दोन दिवसांत ४७८ मिमी पावसाची नोंद झाली. दोन ओढ्यांतून येणारे व कडीकपारीतून कोसळणारे प्रचंड पाणी धरणाच्या जलाशयात जमा झाले. परिणामी पाणी पातळी पुन्हा झपाट्याने वाढली. १२ जुलै रोजी धरण पुन्हा पूर्ण क्षमतेने भरले.

हेही वाचा: कोरोनाविरोधी सेलच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी दिला 'हा' सल्ला

सध्या धरणाच्या दोन्ही बाजूच्या विसर्गामुळे पाणी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे धोका नाही. सांडवा आणखी फोडण्याकरिता अजून यंत्रसामुग्री येणार आहे. ब्रेकरच्या साहाय्याने सांडव्याची उंची अजून कमी करून सांडव्यासमोरील खडकाचा उंच भाग फोडून कमी करण्यात येणार असल्याचे लघू पाटबंधारे उपअभियंता श्रीमंगले यांनी सांगितले. असे असले तरी मुसळधार पावसाने नागरिक व प्रशासनाची चिंता वाढली आहे.

स्थलांतरित घरी परत

स्थलांतरित केलेल्या पणदेरी बौद्धवाडी, रोहिदास वाडी व पणदेरीमधील काही घरांतील नागरिकांना पुन्हा त्यांच्या मूळ घरात सुरक्षितपणे हलवण्यात आल्याची माहिती तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच सुरक्षेच्यादृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

loading image