दैव बलवत्तर! मांजरामुळे वाचले प्राण, घटना अंगावर शहारे आणणारी

भूषण आरोसकर
Tuesday, 4 August 2020

पारिजात फेंड सर्कलचे अमोल आरोसकर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वीज वितरणशी संपर्क साधून पुरवठा खंडित करण्यास सांगितले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्‍यात गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दांडेली गावाला बसला. दुपारच्या फणसमाडे येथील देवेंद्र माणगावकर यांच्या घरावर माड पडून व त्याचबरोबर एक विद्युत खांब पडला; दैव बलवत्तवर म्हणूनच अंगणात बसलेले चौघे थोडक्‍यात वाचल्याने मोठा अनर्थ टळला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आज दुपारी घडली. तत्काळ विद्युत पुरवठा खंडित केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 
 

वाचा - अन् एसटीसमोर गुडघे टेकून ते ढसाढसा रडले

रक्षाबंधनादिवशीच दांडेली-फणसमाडे येथील देवेंद्र माणगावकर यांच्या घराजवळ असलेला माड विद्युत वाहिनीवर कोसळला. झाडाचा भार मोठा असल्याने एक विद्युत खांबही अंगणातील छप्परावर कोसळला. झाड कोसळण्याअगोदर त्याच ठिकाणी सुनिल वझरकर, रामचंद्र माणगावकर, गंगाराम वझरकर व नऊ वर्षाची साक्षी माणगावकर हे चौघे अंगणात बसले होते. रक्षाबंधन कार्यक्रमासाठी सर्वजण घरात गेल्याने अनर्थ टळला. पारिजात फेंड सर्कलचे अमोल आरोसकर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वीज वितरणशी संपर्क साधून पुरवठा खंडित करण्यास सांगितले.

देवेंद्र माणगावकर यांच्या अंगणाच्या छप्पराचे पत्रे, वासे, घराची सर्व्हिस वायर, अंगणातील खुर्च्यांचे मिळून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे श्री.माणगावकर यांनी सांगितले. उशिरापर्यंत पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. 

हेही वाचा - आता फक्त आस प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची!

दैव बलवत्तर....
साक्षी माणगावकर ही नऊ वर्षांची मुलगी अंगणातच बसून होती. वारा-पाऊस सुरू असताना अचानक त्यांच्या घराच्या पायऱ्यांवर तीला मांजर दिसले. साक्षी त्या मांजराला घेण्यासाठी उठली अन्‌ काही सेकंदातच सर्वप्रकार घडला. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्या मुलीचे प्राण वाचल्याचे नागरिकांनी सांगितले; परंतु सर्व घटना सांगताना मात्र देवेंद्र माणगावकर यांच्या डोळ्यात अश्रु येत ते म्हणाले आमची मुलगी वाचली हेच आमच्यासाठी मोठे आहे. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain sawantwadi konkan sindhudurg